सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर हरकती व सुनावण्या मागविण्यात आल्या होत्या. त्यांची सुनावणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्याकडे पार पडली. आलेल्या हरकती व सूचनापैकी जवळपास १७६ हरकती मान्य करण्यात आल्या आहेत, तर १२ हरकती फेटाळून लावण्यात आल्या. त्यामुळे बार्शी बाजार समितीसाठी आता अंतिम ५२५८ मतदारांची मतदार यादी झाली आहे.
बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मागविण्यात आलेल्या सूचनांमध्ये व हरकतीमध्ये सहकारी संस्था मतदार संघातील १६४३ मतदारांवर बारा हरकती आल्या होत्या. त्यांची नावे मतदारसंघ यादीतून वगळावीत अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्या हरकती फेटाळून लावत १६४३
मतदारांची यादी अंतिम करण्यात आली आहे. तर ग्रामपंचायत मतदार संघामध्ये १०३७ मतदारांची
यादी होती, यापैकी एकावरही हरकत आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. व्यापारी मतदार संघात १२७९ हरकती दाखल झाल्या होत्या, त्यापैकी १३३ हरकती मान्य करण्यात आल्या. ज्या मतदाराकडे व्यापारी लायसन्स नव्हते अशा जवळपास १३३ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. हमाल तोलार मतदार संघात १०४२ जणांची मतदार यादी होती, त्यापैकी १७ हरकती मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ५१३ जणांची नावे या मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. तसेच ५५ लोकांनी नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडे असलेल्या लायसन्सची तपासणी केल्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत घेता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. मतदार यादीत नाव असलेल्या जवळपास २६ लोकांच्या नावात दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती ५२५८ मतदारांची यादी अंतिम झाली असून ही यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
चौकट
निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाला पाठवून देणार
मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दहा ते बारा दिवसात निवडणूक कार्यक्रम तयार करून तो मान्यतेसाठी
निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविला जातो. त्यानंतर अंतिम निवडणूक कार्यक्रम जाहीर करून प्रत्यक्ष
निवडणूक कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच ज्या लोकांना मतदार यादीवर आक्षेप असतील किंवा ज्यांचे समाधान झाले नसेल त्यांना आता मात्र कोर्टात जाण्याची वेळ आली.
0 Comments