मंगळवेढा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अतिवृष्टीमुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कांदा, तूर, ऊस, कापूस, बाजरी, मूग यांसारखी पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, सरसकट पंचनामे करावेत, कर्जमाफी जाहीर करून तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी, तसेच बियाणे-खते अनुदान देऊन शेतकऱ्यांना उभारी द्यावी या मागण्यांसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत साळे यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतामध्ये उभारून आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने तातडीने निर्णय घेऊन मदत न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे सर, प्रदेश सचिव रविकिरण कोळेकर, शहराध्यक्ष राहुल घुले, दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन शशिकांत बुगडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रीमंत केदार, दुर्योधन पुजारी व शेतकरी उपस्थित होते.
0 Comments