सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिली महिला बचाव टीम सक्रिय
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सातत्याने निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती काळात तातडीच्या बचाव कार्यासाठी प्रशिक्षित पथकाची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘आपदा मित्र सखी’ टीम सोलापूर जिल्ह्यात तयार करण्यात आली आहे. ही कार्यरत असलेली महाराष्ट्रातील पहिली महिला आपदा बचाव टीम असून, त्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सध्या सुरू आहे.
या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून बोट चालवण्याचा विशेष सराव शिबिर शनिवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी हिप्परगा तलाव परिसरात आयोजित करण्यात आले. शिबिराचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व उत्तर सोलापूर तालुका तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
शिबिरास निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणाची पाहणी केली व उपस्थित आपदा सखींच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अनिल सल्ले व नवनाथ गेजगे उपस्थित होते.
या शिबिरात १५ आपदा मित्र सखी सहभागी झाल्या असून, त्यांनी बोट फिटिंग, बोट चालवण्याचे तंत्र, जलवाहन वापर, पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे उपाय, दम लागल्यास श्वसन नियंत्रण यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा सराव केला.
0 Comments