Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या संकटावर तातडीची मदत द्या — अमोल जगदाळे यांची मागणी

 शेतकऱ्यांच्या संकटावर तातडीची मदत द्या — अमोल जगदाळे यांची मागणी




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- करमाळा व माढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग कोसळून पडला आहे. ऊस, केळी, द्राक्ष, मका, टोमॅटो, डाळिंब, कांदा यांसारख्या महत्त्वाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून जनावरांचा मृत्यू, घरांची पडझड व शेतामध्ये पाण्याचा चिखल साचल्यामुळे शेतकऱ्यांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे धाराशिव व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अमोल जगदाळे यांनी  उपविभागीय अधिकारी, माढा विभाग कुडूवाडी यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर,  राजकुमार सरडे, शेतकरी नेते रत्नदीप बारबोले, विठ्ठल मस्के, जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

जगदाळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, करमाळा व माढा तालुक्याच्या चारही बाजूंनी अतिवृष्टी व ढगफुटी झाल्यामुळे शेतकरी व शेतमजूर अत्यंत हातबल झाला आहे. आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी वर्ग शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे. मुख्यमंत्री सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देतात, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. महाराष्ट्राच्या उत्पन्नात शेतकऱ्यांचा वाटा सात टक्के असताना, रोजगारधारकांचा वाटा ३५ टक्के आहे. धान्य पिकवणारा शेतकरी हा राज्याचा पोशिंदा असूनसुद्धा शासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे, असा आरोपही जगदाळे यांनी केला आहे.

तसेच, वाहतुकीचे रस्ते, हमीभाव, सरसकट कर्जमाफी यांसाठी जास्तीत जास्त निधीचा वाटा शेतकऱ्यांना मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. करमाळा, माढा यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून जनावरे, घरे व शेती पिकांचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असताना शासनाने तातडीने मदतीचे पाऊल उचलावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्याचा सूर या निवेदनातून उमटला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments