मौलाना आझाद पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- १५ सप्टेंबर हा दिवस भारताचे पहिले अभियंता श्री. मोक्शगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती म्हणून अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. मौलाना आझाद पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन क्रेडाईचे माजी अध्यक्ष अभय सुराणा आणि सोशल असोसिएशन कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
होटगी येथील मौलाना आझाद पॉलिटेक्निक मध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात चेअरमन आमेरुद्दीन शेख यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
सुराणा यांनी आपल्या भाषणात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचे जागतिक स्तरावर असलेले महत्त्व सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी निश्चित उद्दिष्ट ठेवून अभ्यास करावा व येणाऱ्या काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार रहावे, असेही ते म्हणाले.
डॉ. तांबोळी यांनी अभियांत्रिकी शिक्षणात केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष अंमलबजावणीचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, मोबाईलचा अति वापर अभ्यासापासून लक्ष विचलित करू शकतो.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सरफराज एन. शेख यांनी विविध अभियांत्रिकी शाखांची माहिती देत, त्यातील संधी व उपयोग यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना केली. तर आभार संस्थेचे संचालक अल्ताफ बुरहान यांनी मानले. महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments