राज्यात ऑक्टोबरपासून पोलीस भरती
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांची १३ हजार ५६० पदे रिक्त असून गणेशोत्सवानंतरपदभरतीला सुरुवात होणार आहे. सध्या रिक्त पदांची बिंदुनामावली पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
राज्याच्या प्रशिक्षण व खास पथकांच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी रिक्त पदांची माहिती गृह विभागाला कळविली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पदभरतीला सुरवात होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या पावसाळा सुरू असल्याने मैदानी चाचणी घेणे अशक्य आहे. दुसरीकडे, राज्यात सध्या
गणेशोत्सवाची धूम आहे. परिणामी राज्यभर पोलीस अधिकारी व अंमलदारांना बंदोबस्ताची ड्यूटी
आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर म्हणजेच सप्टेंबरअखेर उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज मागविले जातील.
उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून एकाच पदासाठी उमेदवार एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकणार नाही. एकान पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केले असतील तर एकच अर्ज पात्र ठरेल. राज्यातील गृह विभागाकडील दहा हजार १८४ पोलिसांची (पोलीस शिपाई, चालक शिपाई) पदे रिक्त आहेत.
याशिवाय बैंड्समन, राज्य राखीव पोलीस बल अशीही दीड हजारांपर्यंत पदे रिक्त आहेत. प्रशिक्षण व खास पथकांच्या विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने रिक्त पदांची माहिती गृह विभागाला दिल्यानंतर मंजुरी मिळून पदभरतीला सुरुवात होणार आहे. राज्यात दरवर्षी सरासरी एकूण पदांपैकी पाच टक्के पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होतात. विभागीय चौकशीअंती बडतर्फ झालेले स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील चार ते पाच टक्के असते. या अनुषंगाने ऑक्टोबरमध्ये साडेतेरा हजारांवर पोलिसांच्या भरतीस सुरुवात होणार आहे. मुंबई वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील उमेदवारांची राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा होईल.
0 Comments