सिद्धेश्वर मंदिरात फुलला भक्तीचा मळा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पवित्र श्रावण महिन्याच्या तिसर्या श्रावण सोमवारनिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात भाविकांच्या अलोट गर्दीमुळे भक्तीचा मळा फुलला होता. पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केल्याने मंदिर परिसराला मिनी गड्डा यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्रींच्या मूर्तीस संत्र्यांची आरास करण्यात आली होती. तसेच कपाळावर चांदीचा विभुती पट्टा लावण्यात आला होता. रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर साकारले होते.
सोमवारी पहाटेच्या सुमारास श्रावण सरी कोसळल्यानंतर निसर्ग हिरवेगार टवटवीत बनले होेते. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास परराज्यातील भाविक मोठ-मोठ्या गाड्या घेऊन आले होते. श्रींच्या मूर्तीस विड्यातील हिरवी पाने आणि सुमारे 200 संत्री फळांची आरास करण्यात आल्याने श्रींची मूर्ती अधिक खुलली होती. श्रींच्या मूर्तीच्या कपाळावर लिंगायत समाज पवित्र मानल्या जाणार्या चांदीतून तयार केलेली विभुतीचा पट्टा लावण्यात आला होता.
गळ्यातील लिंगाकार आणि विभुती पट्ट्यामुळे मूर्तीवर आलेल्या चमकची अनुभूती भाविकांना दर्शनावेळी आली. गुरुराज हब्बू, मंजूनाथ हब्बू, शुभम हब्बू, राजीव हब्बू, सोमशंकर हब्बू यांच्यासह आदींनी श्रींच्या मूर्तीची आरास केली.श्रींच्या मूर्तीस आणि योगसमाधीस रुद्राभिषेक, नामावपली पठण, महाआरती, पालखी प्रदक्षिणा, अक्कीपूजा, पानपूजा करण्यात आल्याचे पुजारी शिवशंकर हब्बू यांनी सांगितले. बसवेश्वर सर्कलच्या वतीने सिद्धेश्वर मंदिरातील सभामंडपात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर केलेले ऑपरेशन सिंदूर साकारले होते. श्री योगसमाधीस आकर्षक फुलांनी मेघडंबरी सजावट करण्यात आली होती. मेघडंबरी सजावटसाठी शिवानंद कोनापूरे यांनी फुलांची सेवा श्रींच्या चरणी अर्पण केली. संम्मती कट्ट्याजवळ उभारण्यात आलेल्या प्रासादिक साहित्यांसह अन्य वस्तूंच्या उभारण्यात आलेल्या साहित्यांमुळे भाविकांनी दर्शनाबरोबरच खरेदीही केली. अन्नछत्रमध्ये सुमारे 5 हजारहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तिसर्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात जाऊन योगसमाधीसह श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी स्वागत केले. यावेळी आ. देवेंद्र कोठे, श्रीकांचन्ना यन्नम यांच्यासह आदी उपस्थित होते.
0 Comments