उबाठा शिवसेनेच्या वतीने पूनम गेटवर आक्रोश आंदोलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सरकारकडे धन दांडग्या उद्योजकांची कर्जमाफी करायला पैसा आहे. मग काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी का होत नाही. भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेण्याऐवजी त्यांची खातेपालट केले जाते. जोपर्यंत शेतकरी कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही. भविष्यात यापेक्षाही मोठे आंदोलन उभा करू पण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देऊ, असे मत शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी व्यक्त केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पूनम गेट येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, धनंजय डिकोळे, जिल्हा महिला संघटिका सीमा पाटील, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, सोलापूर जिल्हा प्रमुख अजय दासरी, महिला संघटिका अनिता जगदाळे, महानगर संघटिका मंगला थोरात, विद्यार्थी सेना प्रमुख लहू गायकवाड, दक्षिण व अक्कलकोट जिल्हाप्रमुख संतोष पाटील, विक्रांत काकडे, उत्तर सोलापूर तालुकाप्रमुख संजय पोळ, जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, शहर संघटिका जोहरा रंगरेज, प्रीती नायर, अनिता राठोड, सुनिता देसाई यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामध्ये घोषणाबाजी आणि पदाधिकारी व शिवसैनिकांनी हातात घेतलेल्या फलकांनी लक्ष वेधले होते.
कलंकित मंत्री, हतबल मुख्यमंत्री, जे भुलतात पन्नास खोक्याला, असले मंत्री हवेत कशाला. घरात बॅग पैशाची, सत्ता ५० खोक्यांची, कृषी मंत्री खेळतोय रमी, कुठे आहे विकासाची हमी, काळे धंदे भ्रष्ट कारभार, सत्ताधारी महाराष्ट्रावर भारी, सरकार हवाय न्यायाचे, नकोय दलाल लुटारूंचे असे फलक यावेळी झळकवण्यात आले होते.
चौकट
स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. हे पालकमंत्री यांनीही मान्य केलेले आहे. तो भ्रष्टाचार लवकर बाहेर आला नाही तर शिवसेना वेगळया पद्धतीने आंदोलन करेल.
- दत्तात्रय गणेशकर,
उपशहर प्रमुख सोलापूर
0 Comments