सांस्कृतिक सेल प्रमुखपदी मयुरी बाबर यांची नियुक्ती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मयुरी विश्वनाथ बाबर यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक सेल सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा पत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
ही नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस सहप्रभारी एस. एन. संदीप यांच्या संमतीने तसेच सोलापूर जिल्हा प्रभारी मोहन जोशी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या हस्ते मयुरी बाबर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीत जिल्हा काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या प्रतिनिधी तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना अध्यक्ष सातलिंग शटगार म्हणाले, “मयुरी बाबर यांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांतून तरुण पिढीला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला नवसंजीवनी मिळेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
मयुरी बाबर यांनी या नियुक्तीबद्दल काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. “कला आणि संस्कृती हे समाजजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. सोलापूर जिल्ह्यातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे, स्थानिक संस्कृतीचा प्रचार व्हावा आणि तरुणाईला या क्षेत्राकडे आकर्षित करावे, हेच माझे ध्येय आहे,” असे त्या म्हणाल्या.

0 Comments