..तर देवेंद्र फडणवीस यांना पळता भुई थोडी होईल"
उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
मुंबई (कटूसत्य वृत्त):-आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो, तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे.
भ्रष्टाचाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. पण यांना डोकं असेल तर ना, यांना नुसते पाय आहेत सुरत आणि गुवाहाटीला पळून जायला. असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतर्फे विरोधी खासदारांचा मोर्चा निघाला आहे. तो पोलिसांनी अडवल्याचं समजतं आहे. या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचाऱ्याच्या पहिल्या रांगेत बसवला आणि विकासाच्या रांगेत शेवटी बसवला आहे. यांचा कारभार जनताभिमुख नाही तर पैसे गिळणाऱ्याचं यांचं तोंड आहे. कुणी डान्सबार चालवतंय, कुणी बॅगा घेऊन बसलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला काही वेळ नाही. देवेंद्र फडणवीस भाजपाची परंपरा पुढे चालवणारे आहेत असं वाटलं होतं. पण त्यांनी गैरवर्तन करणाऱ्यांना फक्त समज देऊन सोडून दिलं आहे. भ्रष्टाचाऱ्यांविरोधात पुरावे असूनही सोडून देणार असाल तर मग धनकड कुठे आहेत याचंही उत्तर द्या. असंही उद्धव ठाकरे म्हणाले. धनकड यांचा राजीनामा का घेतला? हे कळलेलंच नाही. त्यांना तडकाफडकी काढून गायब केलं. धनकड यांना समज का दिली नाही? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.
चीनचा पॅटर्न भारतात राबवला जातो आहे ?
चीनमध्ये कळत किंवा नकळत सरकारमध्ये कुणी काही बोललं तर तो माणूस गायब होतो. उपराष्ट्रपती आहेत कुठे? ते तरी दाखवा. त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ते कुठल्या रुग्णालयात आहेत? की तुम्ही त्यांचं ऑपरेशन केलं? याचं उत्तर द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आज मी सगळ्यांना म्हणजेच सगळ्या शिवसैनिकांना सांगतोय मोदींनी जशी चाय पे चर्चा केली होती तशी तुम्ही आता लोकांशी चर्चा करा. आता भ्रष्टाचार पे चर्चा करा. भ्रष्टाचारी मंत्री जोपर्यंत हाकलले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही.
मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते आहे-उद्धव ठाकरे
मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते, तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, दिल्लीत तुमचे बाप बसले आहेत तरीही भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही काढून टाकत नाही? देवेंद्र फडणवीस यांनी काही भ्रष्टाचार केला नाहीये असं गृहीत धरु मग तुम्ही भ्रष्ट लोकांवर पांघरुण का घालता? भाजपा म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाही. तसं भ्रष्ट मंत्र्यांच्या जागीही कुणी मिळत नाही का? देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं मला या लोकांना काढायचं आहे पण सहन होत नाही आणि सांगता येत नाही असा दबाव आहे. आमचं तर म्हणणं आहे की झुगारुन द्या सगळा दबाव. देवेंद्र फडणवीस हे चीफ मिनिस्टर नाहीत तर थीफ मिनिस्टर आहेत असं काँग्रेसने त्यांना म्हटलं आहे. चांगला शब्द दिला आहे. देवेंद्र फडणवीसांमध्ये थोडासा जरी स्वाभिमान असेल तर वरचा दबाव पाहू नका. कारण इथला दबाव वाढला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल.
0 Comments