शाळेतल्या दिवसांनी परत यावं...
आईने हातातलं काम सोडून
घाईने आपलं दफ्तर भरावं
रोजची होणारी तिची चिडचिड पाहून
गालातल्या गालात आपण हसावं
खरंच यार,
त्या शाळेतल्या दिवसांनी परत यावं
बाबांनी डोळे वटारावे अन्
पुस्तकांनी आपोआप हातात यावं
प्रगतीपुस्तक पोराचं पाहून
त्यांच्या डोळ्यांनी पुन्हा भरून यावं
खरंच यार,
त्या शाळेतल्या दिवसांनी परत यावं
अभ्यासात चुकावं दंग्यात सापडावं
मास्तरांच्या छडीने शहाणपण यावं
जगाच्या स्पर्धेत पुढे जाताना
आयुष्याचं गणित अलगद सुटावं
खरंच यार,
त्या शाळेतल्या दिवसांनी परत यावं
खेळताना पडावं गुडघ्यांनी फुटावं
मैदानावर मातीत कपड्यांनी लोळावं
रडीचा डाव खेळूनही मित्रासोबत
पुन्हा एकाच डब्यात बसून जेवावं
खरंच यार,
त्या शाळेतल्या दिवसांनी परत यावं
सगळ्यांची नजर चुकवावी अन्
तिच्याकडे चोरून पहावं
एखाद दिवशी नाहीच दिसली तर
तिच्या घरासमोरून नकळत जावं
खरंच यार,
त्या शाळेतल्या दिवसांनी परत यावं
माणसांच्या गर्दीत पाऊले पुढे जाताना
भरकटलेल्या मनानं का मागं रहावं
त्याला ओढ मात्र एकच
त्या शाळेतल्या दिवसांनी परत यावं
त्या शाळेतल्या दिवसांनी परत यावं...
- अथर्व शरद म्हमाणे
मोहोळ,सोलापूर
मो.नं - 9665798775
0 Comments