कहाणी - नावापुरत्या राजाची
यंदा पाणी चांगलं झालं
पीक बी आता जोमान येणार
राजाच्या मालकिनीला वाटलं
आपलं दारिद्र्य यावर्षी नक्की जाणार
लग्नाची पोर समोर होती
शिकायलेल्या पोराची याद आली
नव्या उमेदीनं त्याच जोमान
कष्ट करायला ती पुन्हा तयार झाली
सकाळच्या भाकऱ्या उरकून
धन्याच्या जोडीला शेतात जायची
सूर्यदेव नजरेपल्याड जाईपर्यंत
दोघांच्या घामानं जमीनही धन्य व्हायची
पीक बी आता डोलत होतं
चांगल्या दिवसाचं स्वप्न दाखवत होतं
धन्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघून
मालकिणीचं मन सुखावत होतं
शेवटी तो दिवस उजाडला
पीक आता काढायला आलं
गोण्यात भरून पूजा करून
सकाळी लवकर आडतीला नेलं
व्यापारी आले बोली लागल्या
राजाची पुन्हा निराशा झाली
कृषिप्रधान देशात आपल्या
शेतकरी राजाचीच ओंजळ खाली
कर्जात दबलेला शेतकरी राजा
निराश होऊन घरी आला
खिशात आणलेल्या विषानं
अख्ख्या कुटुंबानं रात्रीत जीव दिला
खरं सांगतो मित्रांनो,
पुढाऱ्यांची कर्जमाफी सरकारी विमे
फुकटच काही काही हवं नसतं
कष्टाचं आमच्या मोल करा
एवढंच अन्नदात्याचं म्हणणं असतं
शेवटी फक्त एक सांगतो,
5 रु पेंडित मोलभाव करताना
हॉटेलात दिलेलं बिल आठवा
आपल्या भाकरीसाठी जगणाऱ्या
माझ्या शेतकरी राजाला वाचवा
अथर्व शरद म्हमाणे.
मोहोळ, सोलापूर.
मो. नं.9665798775
0 Comments