Hot Posts

6/recent/ticker-posts

स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला नेतृत्व हा सशक्तीकरणाचा क्रांतिकारी पाऊल- खा. प्रणिती शिंदे

 स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला नेतृत्व हा सशक्तीकरणाचा क्रांतिकारी पाऊल- खा. प्रणिती शिंदे




नवी दिल्ली,(वृत्त सेवा):- भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी स्टडी सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने, कालनिधी हिस्ट्री असोसिएशन, शामाप्रसाद मुखर्जी कॉलेज, दिल्ली विद्यापीठ यांच्या सहकार्याने “तळागाळातील लोकांचा आवाज : स्थानिक स्वराज्यातील महिला नेतृत्व” या विषयावर राष्ट्रीय शोध निबंध स्पर्धेचे आयोजन जवाहर भवन, नवी दिल्ली येथे करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेने स्व. राजीव गांधी यांच्या दृष्टिकोनाला उजाळा देणे हा होता.
          या स्पर्धेत देशभरातून ९० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपापले शोध निबंध (केस स्टडी) सादर केले. त्यापैकी सखोल मूल्यमापनानंतर निवडलेल्या शीर्ष २० विद्यार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान आपले अध्ययन सादर केले. यावेळी त्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
          कार्यक्रमाला विशेष मान्यवर म्हणून राजस्थानचे माजी मुख्यमंत्री श्री. अशोक गहलोत, खासदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री मीनाक्षी नटराजन, वरिष्ठ पत्रकार निधी कुलपति आणि प्रा. साधना शर्मा उपस्थित होते.
          या राष्ट्रीय केस स्टडी स्पर्धेत खासदार प्रणिती शिंदे यांनी आपले सखोल विचार आणि समृद्ध अनुभव मांडत विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली. त्यांनी स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग हा केवळ प्रतिनिधित्वापुरता मर्यादित नसून सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल आहे.
          माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महिलांसाठी प्रतिनिधित्वाची नवी दारे खुली झाली आणि आज त्या सक्षम नेतृत्वाच्या रूपात उदयास येत आहेत.
या उपक्रमातून तळागाळातील नेतृत्व, महिलांचे सशक्तीकरण आणि लोकशाही बळकट करण्याच्या स्व. राजीव गांधींच्या दूरदृष्टीला ठळकपणे अधोरेखित करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments