डीजेमुक्त सोलापूर अभियानासाठी आज निघणार डॉक्टरांची रॅली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- डीजेमुक्त सोलापूर अभियानासाठी आत्ता शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटना पुढे सरसावल्या आहेत. सोमवारी (२५ ऑगस्ट) सकाळी साडेदहा वाजता ऑफिसर क्लब ते पोलीस आयुक्तालय या मार्गावरून डॉक्टरांची रॅली निघणार आहे. त्यानंतर आयुक्तांना शाश्वत डीजे बंदीसाठी निवेदन देण्यात येणार आहे.
डीजेमुक्त सोलापूर कृती समितीच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन), हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी या संघटना सहभागी होणार असल्याचे डीजेमुक्त सोलापूर कृती समितीचे अध्यक्ष ॲड. धनंजय माने यांनी सांगितले.
शहरात डीजे मूक्त सोलापूर कृती समितीच्या वतीने या गणेशोत्सवापासून डीजे कायमचा बंद करावा यासाठी आंदोलने सुरु झाली आहेत. सुरवातीला ज्येष्ठ नागरिक संघांनी मोर्चा काढला. त्यानंतर आता आयएमए संघटनेने या विरोधात आवाज उठवून डीजे आरोग्यास घातक असल्याची भूमिका मांडली. निमाने त्यांच्या सदस्यांची डीजे विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरु केली. आतापर्यंत २०४ डॉक्टरांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या अत्यवस्थ रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रस्त्यावरील डीजेचा त्रास असह्य होऊ लागला आहे. डीजेचा त्रासातून सोलापूर शहर मुक्त व्हावे अशी भूमिका घेऊन या संघटना पोलिस आयुक्तांकडे मागणी करणार आहेत.
अधिकाधिक डॉक्टरांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन डीजेमुक्त सोलापूर कृती समितीचे अध्यक्ष ॲड. धनंजय माने, आयएमएच्या अध्यक्षा डॉ.मंजुषा शहा, निमाचे सोलापूर शाखा अध्यक्ष, डॉ. नागनाथ जिड्डीमनी, हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मंठाळे व होमिओपॅथी डॉक्टर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील वरळे, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कौस्तूभ तांबेकर यांच्यासह विविध वैद्यकीय संघटनांनी केले आहे.
0 Comments