मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापूरकरांना आयटी पार्कचे गाजर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या दौर्यात अनेक आश्वासनांचे फुगे सोडले. स्थानीक स्वराज्य संस्थांची निवडणूक आगामी सहा महिन्यांत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरात विविध योजना आणि घोषणांनी जोर पकडला आहे. सर्वाधिक चर्चेत आहे ते 'सोलापूरचे आयटी पार्क.' सोलापुरातील मुले पुणे, मुंबईत कामाला आहेत. त्यांच्यासाठी सोलापुरातच आयटी पार्कची निर्मिती व्हावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
या मागणीला हवा देण्याच काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे.सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथे आयटी उद्योग आणण्यात येतील. शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने इथल्या औद्योगिक विकासावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही चांगली जागा शोधून द्या, मी आयटी पार्क बांधून देतो, अशी घोषणा केली. त्यानंतर सोशल मीडियावर 'सोलापूरच्या आयटी पार्क'ची अनेक संकल्पचित्रे व्हायरल होत आहेत. यातील एका संकल्प चित्रामध्ये आयटी पार्कच्या इमारती हवेत उडत आहेत. खाली भेगाळलेली जमीन आहे. बाजूला मंदिरे आहेत. हे संकल्पचित्र पाहून अनेक जण आपले मत सोशल मीडियावर व्यक्तकरीत आहेत.
जिल्ह्यात नामांकित १४ अभियांत्रिकी महाविद्यालये असून त्यातून दरवर्षी पाच हजार अभियंते शिक्षण पूर्ण करतात. मनुष्यबळ, पाणी, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, राहण्याची उत्तम सोय, चिंचोळी एमआयडीसीत इमारत व अन्य एमआयडीसींमध्ये जागेची पुरेशी उपलब्धता आणि आता विमानसेवा अशा सर्व सोयी-सुविधा असतानाही स्मार्ट सोलापूरमधील तरुण-तरुणींना अद्याप आयटी पार्कची प्रतीक्षाच आहे. दूरदृष्टी असलेले प्रशासकीय अधिकारी असतानाही सोलापूरमध्ये आयटी पार्क नाही . शेजारील पुणे जिल्ह्यात आयटी पार्कची गर्दी झालेली असतानाही लोकप्रतिनिधींना आपल्या जिल्ह्यातील तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी आतापर्यंत एकही आयटी पार्क आणता आले नाही.
सोलापुरातील हजारो तरुण-तरुणी बंगळूर, पुणे, मुंबईसह अन्य एमआयडीसींमधील आयटी पार्कमध्ये कार्यरत आहेत. निवडणुकीवेळी त्याच तरुण-तरुणांना बोलावणारे लोकप्रतिनिधी आतातरी स्थलांतर रोखून शहर-जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आयटी पार्क आणतील का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींना यशस्वी प्रयत्न करावेच लागतील, अन्यथा प्रत्येक निवडणुकीत माता-पित्यांना सोडून परजिल्ह्यात-परराज्यात नोकरीसाठी गेलल्या त्या तरुणांच्या कुटुंबांना आयटी पार्क सोलापुरात का आले नाही? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. सोलापूरच्या चिंचोळी एमआयडीसीमध्ये आयटी पार्कची इमारत धूळखात आहे. तीन वर्षांपूर्वी डोणगाव रोडवर आयटी पार्कचे भूमिपूजन झाले. या भूमिपूजनामुळे आजूबाजूच्या जागेचे भाव वाढले. डेव्हलपर्स आणि दलाल यांनी यात हात धुऊन घेतले. आता आयटी पार्कच्या जागेसाठी जागेचा शोध सुरू आहे. कुंभारी, अक्कलकोट रोड, डोणगाव, सोरेगाव यासह विविध भागांतील खुल्या जागा चर्चेत आहेत. या चर्चेमुळे जागेच्या व्यवहारात काही जण मलाई खातील हे स्पष्ट आहे. हल्ली सोलापूरात माजी नगरसेवक,माजी आमदार,राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बांधकाम व्यवसायात उतरले असल्याने यात कोणाची चांदी होणार हे ही स्पष्ट आहे.प्रश्न आहे तो सर्वसामान्य सोलापूरातील युवकांना रोजगाराची गाजर अजून कीती वर्ष दाखवणार?पुण्यातील हींजवडीचे आयटी पार्क आता हळूहळू रिकामे होत आहे.या कंपन्यांना सोलापूर का दाखवले जात नाही?पुण्यापासून रेल्वेने चार तासांवर असलेले शहर आयटीपार्कसाठी योग्य आहे हे का सांगीतले जात नाही?कीती दीवस सोलापूरकरांना आश्वासनाची गाजरे आणी फुगे दाखवून तुम्ही फसवणार आहात याचे उत्तर सत्ताधार्यांना जनता विचारते आहे.
0 Comments