सोलापूरमध्ये भव्य जाहीर सभा व राज्य अभ्यास शिबिराच्या जय्यत तयारीला सुरुवात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- “महाराष्ट्राच्या राजकारणात लोकशाही, सामाजिक न्याय आणि विकासाचे नवे पर्व सुरू करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हीच लढाई निर्णायक ठरेल,” असे प्रतिपादन भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी केले.
सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने दिनांक ६ ऑगस्ट रोजी दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे सचिव मंडळ सदस्य व माजी नगरसेवक कॉ. व्यंकटेश कोंगारी होते.
कॉ. आडम मास्तर पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि परिवर्तनवादी विचारांची भूमी असली तरी आज ती अनेक राजकीय आणि सामाजिक संकटांनी ग्रासलेली आहे. जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरणारे आमदार, सत्ताधाऱ्यांचे पक्षांतराचे राजकारण, भ्रष्टाचाराने पोखरलेली यंत्रणा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, सामाजिक तेढ, महिला अत्याचार आणि शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील गळती — ही सगळी गंभीर आव्हाने आहेत.”
या पार्श्वभूमीवर केरळमधील डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार हे संपूर्ण देशासाठी एक प्रेरणास्थान ठरले आहे. लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या विकासाच्या मॉडेलचा मागोवा घेण्यासाठी व पक्ष बांधणीसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) येत्या २२ ते २४ ऑगस्टदरम्यान सोलापूर येथील रे नगरमध्ये राज्यस्तरीय शाखा सचिव अभ्यास शिबिर आयोजित करीत आहे. या शिबिरात संपूर्ण राज्यभरातून ३५० हून अधिक शाखा सचिव सहभागी होणार आहेत.
या शिबिराचा समारोप २४ ऑगस्ट रोजी कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन, सोलापूर येथे होणाऱ्या केरळचे मुख्यमंत्री कॉ. पिनराई विजयन व माकपचे माजी महासचिव कॉ. प्रकाश करात यांच्या भव्य जाहीर सभेने होणार आहे. या सभेला किमान २०,००० लोक सहभागी होतील, असा ठाम विश्वास कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केला.
पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. एम.एच. शेख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “हे अभ्यास शिबिर व जाहीर सभा केवळ संघटनात्मक कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या राजकीय परिवर्तनाची पायाभरणी ठरेल. सर्व लढाऊ कार्यकर्त्यांनी क्रांतिकारी उत्साहात, अहोरात्र मेहनत घेऊन यशस्वी करावी.”
या सभेचे प्रास्ताविक जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख मेजर यांनी केले. श्रद्धांजली ठराव कॉ. किशोर मेहता यांनी मांडला. सूत्रसंचालन कॉ. बापू साबळे यांनी तर आभार प्रदर्शन कॉ. ॲड. अनिल वासम यांनी केले.
0 Comments