Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शी तालुक्यातील मराठा मुंबईला धडकणार

 बार्शी तालुक्यातील मराठा मुंबईला धडकणार
 


वैराग (काटूसत्य वृत्त):- मराठा समाजाला सगेसोयरे कायद्याद्वारे सरसकट ओबीसी आरक्षण मिळावं, यासाठी २९ ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे मुंबईत आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्यासोबत बार्शी तालुक्यातील घराघरातून मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गावोगावी घोंगडी बैठकांचे आयोजन केले जात आहे. बार्शी तालुक्यातील तडवळे येथे देखील या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकल मराठा समाजाने मुंबईला येण्याचे अभिवचन दिले असून जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत मागे फिरणार नसल्याचा निर्धारही केला आहे.


मराठा आरक्षण लढ्यामध्ये प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन वेळप्रसंगी पोलिसांच्या केसेस स्वीकारून आरक्षणाची धग कायम ठेवणाऱ्या बार्शी तालुक्यातील तडवळे येथे सकल मराठा समाजाची घोंगडी बैठक पार पडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. कपिल कोरके, आनंद काशीद, युवराज काटे, घोडके यांच्या हस्ते करण्यात आले.


२९ ऑगस्ट रोजी निर्णायक लढ्यासाठी मुंबईला मराठा बांधव जाणार आहेत. त्यामध्ये तडवळे गावातील मराठा बांधव देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यावेळी माजी सरपंच अमर लोखंडे म्हणाले की, आम्ही या लढ्यामध्ये यापूर्वीही सक्रिय होतो आणि यापुढेही राहू, मुंबईला जाण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊ असे आश्वासन दिले. तर आनंद काशीद यांनी हा मराठा आरक्षणाचा लढा आता रस्त्यावरचाच नाही तर घराघरात पोहोचलेला लढा निर्माण झाला आहे. जगदंबा शैक्षणिक परिवाराचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके म्हणाले की, बार्शी तालुक्यातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी या लढ्यात सहभागी होणे गरजेचे आहे. हा लढा समाजाचा शेवटचा लढा असल्यामुळे हा आपल्याला यशस्वी करून जिंकायचा आहे.


बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती युवराज पाटील यांनी यावेळी मराठा समाजाने संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आपल्या समाजाचे कल्याण करून घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने या लढ्यात सहभागी व्हा आणि आपल्या पुढच्या पिढीचे कल्याण करून घ्या, असे आवाहन यावेळी केले. घोडके यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा विजयापर्यंत नेण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्यामुळे आपण मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments