पोलीस बघून घेतील म्हणजे काय? तुम्हाला हल्ले घडवून आणायचेत का?
जरांगे पाटील यांचा फडणवीसांना सवाल!
जालना (कटूसत्य वृत्त):- ओबीसीतून मराठा आरक्षण या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या 29 तारखेला मुंबईत मराठा समाजाचा भव्य मोर्चा धडकणार आहे. परंतु त्यापूर्वीच राज्यातील वातावरण तापल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर दौऱ्यावर असताना त्यांना मुंबईतील मराठा मोर्चा संदर्भात माध्यमाने प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पोलीस तो बघून घेतील, असे उत्तर दिले होते. हाच धागा पकडत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
'बघून घेतील म्हणजे काय? फडणवीस म्हणजे पोलीस आणि पोलीस म्हणजे फडणवीस हे समीकरण राज्यात आहे. तुम्ही काय आमच्यावर हल्ले करणार आहात का? असा सवाल करत फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब आधी जे घडलं ते घडलं! आता जर माझ्या पोरांना धक्का लागला तर संपूर्ण राज्य कायमस्वरूपी बंद होईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी परभणी येथे समाज बांधवांशी बोलताना दिला. आम्ही शांततेत मोर्चा घेऊन मुंबईत येणार आहोत, तुम्ही राज्याचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नका.
मराठे आता थांबणार नाहीत, देवेंद्र फडणवीस षडयंत्र करत आहेत अशी लोकांमध्ये चर्चा होती. आधी मला ती खोटी वाटली परंतु पोलीस बघून घेतील या त्यांच्या इशाऱ्यानंतर ते सिद्ध होत आहे. माझं त्यांना हात जोडून सांगणं आहे, की गेल्यावेळी केला तसा प्रयोग किंवा प्रयत्न त्यांनी यावेळी करू नये. अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, महाराष्ट्र राज्य भविष्यात कायमस्वरूपी बंद होईल आणि दिल्लीतल्या मोदी सरकारलाही याचा त्रास सहन करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात ओबीसी अधिवेशनात सहभाग नोंदवत 'मी ओबीसी साठी लढणार' असे विधान केले. मग मराठा समाजासाठी कोण लढणार? दलित मुस्लिम समाजाने तुम्हाला मतदान केले नाही का? मराठ्यांनी तुम्हाला सत्तेत आणलं आणि तुम्ही ओबीसीसाठी लढणार. मराठा समाजाबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या मनात किती द्वेष आहे हे यातून सिद्ध झाल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
फडणवीस यांनी गोव्यातील ओबीसी अधिवेशनात जाऊन त्यांच्या नेत्यांचे कान भरले. आंदोलनाच्या काळात राज्यात दंगल भडकवण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप जरांगे यांनी पुन्हा केला. मी मॅनेज होत नाही म्हणून माझ्यावर फडणवीस हल्ला करतात, असा आरोप करताना 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सोडणार आहे. मराठ्यांना आव्हान आहे की, त्यांनी दिसेल त्या मार्गाने मुंबईत घुसायचे. यंदा माघार नाही आरक्षण घेऊ आणि ओबीसीतूनच घेऊ, असा दमही जरांगे पाटील यांनी यावेळी भरला.
0 Comments