Hot Posts

6/recent/ticker-posts

घर एकच अन् मतदार तब्बल 119, मतदार यादीतला मोठा घोळ समोर

 घर एकच अन् मतदार तब्बल 119, मतदार यादीतला मोठा घोळ समोर





मुंबई (कटूसत्य वृत्त):- लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासह इतरही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपानंतर आता निवडूक आयोगाला आरोपींचा पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय.

देशभरात तसेच महाराष्ट्रातही याविरोधात काँग्रेसने आंदोलनं केली. राहुल गांधी यांनी हे आरोप करताना थेट पुरावेच सादर केले होते. दरम्यान, त्यांच्या आरोपांनंतर आता चंद्रपुरातून धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. येथे एकाच घरात तब्बल 119 मतदारांची नोंद सापडली आहे. काँग्रेसनेच हे प्रकरण बाहेर काढले असून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

एकाच घरात 119 मतदार, नेमके कसे?

मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या गावातून हा प्रकार समोर आला आहे. येथे एकाच घरात तब्बल 119 मतदारांची नोंद सापडली आहे. तसं पाहायचं झालं तर या घरात केवळ दोनच मतदार आहेत. त्यामुळे याच घरात 100 पेक्षा जास्त मतदारांची नोंद नेमकी कशी झाली? असा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. घुग्गुस हे ग्रामपंचायत असलेले औद्योगिक गाव आहे. या गावात तसेच पंचक्रोशीत अनेक कंपन्यांचे कारखाने आहेत. याच गावात सचिन बांदुरकर यांचे 350 क्रमांकाचे घर आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत या घरातून तब्बल 119 मतदारांची नोंदणी झाली आहे.

यादी तपासताच समोर आला घोळ

या सर्वच 119 मतदारांचा घर क्रमांक हा 350 आहे. एका लहानशा घरात एवढ्या मतदारांची नोंद कशी काय करण्यात आली, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केली असता हा घोटाळा समोर आला. हा घोटाळा समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे.

सखोल चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

दरम्यान, एकाच घरात तब्बल 199 मतदारांची नोंद झालेले हे लोक कोण? या मतदारांची नोंदणी कुणी केली? मतदारांची नोंदणी करताना हा प्रकार अधिकाऱ्यांना समजला नाही का? की हे सर्वजण बोगस मतदार आहेत? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे हे प्रकरण समोर आल्यानंतर घरमालकही चकित झाला आहे. मला याबाबत काहीच कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया घरमालकाने दिली आहे. दुसरीकडे हे प्रकरण समोर आल्यानंत तेथे काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला असून त्याची सखोल चौकशी करावी? अशी मागणी करण्यात आली आहे.

निवडणूक आयोग काय करणार?

त्यामुळेच आता समोर आलेल्या या प्रकाराची निवडणूक आयोग नेमकी काय दखल घेणार? आयोगातर्फे याची चौकशी केली जाणार का? चौकशी झालीच तर नेमके काय सत्य बाहेर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments