Hot Posts

6/recent/ticker-posts

साेलापूर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा तिढा लवकरच सोडवू

 साेलापूर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा तिढा लवकरच सोडवू




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळिराम साठे यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय लवकरच जाहीर करावा, अशी मागणी केली. या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिले.
दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे पक्षाची प्रदेश पातळीवरील बैठक झाली. यावेळी उत्तरमधील कार्यकर्त्यांनी शिंदे यांची भेट घेतली. अडीच महिन्यापूर्वी साठे यांना अचानकपणे पदमुक्त करण्यात आले. त्यामुळे साठे गट नाराज आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच मुंबईत पक्षाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातून ज्येष्ठ नेते बळिराम साठे, तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, नागेश पवार, मनोज साठे हे उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाध्यक्षपदाच्या विभागणीचा निर्णय लवकर घ्यावा, अशी विनंती केली.

जून महिन्यात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बळिराम साठे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून दूर करत मोहिते पाटील यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांची नियुक्ती केली. यामुळे नाराज झालेल्या साठे यांनी त्यावेळी मोहिते पाटील व जयंत पाटील यांच्यावर उघड नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यानंतर घडलेल्या घडामोडीमुळे त्यांनी आपला निर्णय रद्द केला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष पदाची विभागणी करत सोलापूर शहर परिसरातील तालुक्यांसाठी साठे यांची पुन्हा नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप याबाबत पक्षाने निर्णय जाहीर केला नाही. यामुळे साठे गटाच्या कार्यकर्त्यात अस्वस्थता पसरली आहे. मुंबई येथील बैठकीच्या वेळी कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांचीही भेट घेतली. त्यांनीही सोलापूरच्या निवडीबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह इतर नेत्यांनी लवकर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यामुळे साठे गटाच्या आशा पल्लवीत झाले आहेत. या बैठकीच्या वेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी मात्र चर्चा झाली नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments