Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात रोज ४० जनावरांना 'लम्पी स्कीन'ची बाधा

 सोलापूर जिल्ह्यात रोज ४० जनावरांना 'लम्पी स्कीन'ची बाधा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ८५४ लम्पीबाधित जनावरे आढळली आहेत. त्यातील एक हजार ३८० जनावरे बरे झाले आहेत. जनावरे बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी रोज जिल्ह्यात ३० ते ४० लम्पीबाधित जनावरांची भर पडत आहे.

तर ५४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुपालकांनी गोवर्गीय जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने केले आहे.

जिल्ह्यात लम्पीची साथ असून संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तर पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात सात लाख ७४ हजार गोवर्गीय जनावरे आहेत. त्या तुलनेत सध्याची लम्पीबाधित जनावरांची संख्या नगण्य आहे.

मात्र, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून रोज ३० ते ४० लम्पीबाधित जनावरे आढळत आहेत. तर ४१५ सक्रिय लम्पीबाधित जनावरे आहेत. त्यामुळे पशुपालकांनी गोवर्गीय जनावरांची काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. तसेच उपाययोजना करतानाच नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधण्याची आवश्‍यकता असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले.

सेसमधून एक लाख ९० हजार लसी उपलब्ध

जिल्हा परिषदेने सेसमधून एक लाख ९० हजार ४०० लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या गुरुवारी (ता. ७) पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाला प्राप्त झाल्या असून त्यांचे पंचायत समिती स्तरावर तातडीने वितरण करण्यात येणार आहे. आजारी नसलेल्या जनावरांना लसीकरण केले जाणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने सांगितले.

सोलापूरजिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत रोज ३० ते ४० लम्पीबाधित जनावरे आढळत आहेत. जनावरे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. सोलापूर शहरातील मोकाट जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे आढळल्यावर त्यांच्या विलगीकरणाची महापालिकेने सोय केली आहे. मात्र, लम्पीची लागण झालेली गोवर्गीय जनावरे मोकाट सोडू नये. पशुपालकांनी उपाययोजना करतानाच जनावरांवर उपचार करून घ्यावेत.

Reactions

Post a Comment

0 Comments