Hot Posts

6/recent/ticker-posts

पक्ष शाखा सचिव हा पक्षाचा मुख्य कणा"- कॉ. डॉ. अजित नवले

 पक्ष शाखा सचिव हा पक्षाचा मुख्य कणा"- कॉ. डॉ. अजित नवले




सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- "भारतामध्ये वैचारिक मतभेदानंतर १९६४ साली भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ची स्थापना झाली. या पक्षाचा शाखा सचिव हा मध्यवर्ती केंद्रबिंदू असून, तो पक्षाचा कणा आहे. त्याची निवड लोकशाही पद्धतीने केली जाते. पक्ष घटना आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे दायित्व शाखा सचिवावरच असते", असे प्रतिपादन माकपाचे राज्य सचिव कॉ. डॉ. अजित नवले यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, "शाखा सचिव हा नेहमी शाखेतील अन्य सदस्यांशी सुसंवाद साधणारा, नियमित बैठक घेणारा, स्थानिक प्रश्नांवर चर्चा करणारा, पक्षाचे मुखपत्र व साहित्याचा प्रसार करणारा, तसेच जनतेला त्यांच्या सामाजिक-आर्थिक प्रश्नांची जाणीव करून देऊन त्यांना लढ्यात उतरविणारा असला पाहिजे. जनतेशी प्रामाणिक राहणे हा शाखा सचिवाचा सर्वात मोठे गुण आहे. विश्वास आणि सौहार्दपूर्ण भावनेतून कॉम्रेडशिप दृढ होते. ‘कॉम्रेड’ म्हणजे सखा, जिवलग मित्र व सार्वजनिक जीवन जगणारा व्यावसायिक क्रांतिकारक. अशा सचिवामुळे शाखा मजबूत होते व पक्षाचा जनाधार वाढतो."

डॉ. नवले यांनी पक्ष शाखेचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की, "शाखा म्हणजे पक्षाची रक्तवाहिनी आहे. सदस्यत्व स्वीकारताना घेतलेल्या शपथेनुसार शाखेतील प्रत्येक सदस्य आपले व्यक्तिगत हित बाजूला ठेवून व्यापक जनहिताला प्राधान्य देतो. सामूहिक निर्णय प्रक्रियेने घेतलेले निर्णय काटेकोरपणे राबविण्याचे पहिले कर्तव्य शाखा निश्चित करते.

"शाखेत स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रश्नांवर विचारविनिमय केला जातो. सत्ताधारी पक्षांच्या जनता-विरोधी धोरणांची चर्चा केली जाते. यामुळे सदस्यांच्या ज्ञानात भर पडते, आकलनशक्ती वाढते आणि वैचारिक प्रगल्भता निर्माण होते. शाखा म्हणजे जनतेला लोकशाही, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष क्रांतीकडे नेणारे केंद्र आहे.

"आजच्या महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत माकपच्या शाखा सचिवांची जबाबदारी अधिक वाढली आहे. पक्षाने निश्चित केलेले कार्य पूर्ण करणे आणि जनवादी क्रांतीला उभारी देणे हेच आजचे महत्त्वाचे कार्य आहे". असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments