एमआयटी विश्वप्रयागमध्ये ‘विश्वारंभ’ स्वागत समारंभ उत्साहात संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठात ‘विश्वारंभ’ हा यावर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी, संचालक राघवेंद्र एम. चाटे, अधिष्ठाता, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठाची शैक्षणिक परंपरा, मूल्यव्यवस्था आणि भविष्यातील संधींविषयी मार्गदशन करण्यात आले. यावेळी सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना प्रा. स्वाती कराड चाटे म्हणाल्या की, आजच्या स्पर्धात्मक युगात आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसायिक यशावर भर देणाऱ्या शिक्षणामध्ये नैतिक मूल्यांची पायाभरणी आणि सामाजिक जाणीवेची दिशा आवश्यक आहे. तरच आपण संतुलित आणि शाश्वत विकास साधू शकतो. यासाठी एमआयटी विश्वप्रयाग मध्ये विद्यार्थ्यांना सजग आणि संवेदनशील नागरिक म्हणून घडविताना त्यांना आत्मकेंद्रित नव्हे, तर समाजकेंद्रित विचार करण्यासाठी प्रेरित केले जाते. आजच्या या ‘विश्वारंभ’ मधून सर्व विद्यार्थी याच प्रेरणादायी शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणार आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यापीठाची तत्वे, मूल्यव्यवस्था, शैक्षणिक दृष्टीकोन तसेच उपलब्ध संधीविषयी मार्गदर्शन केले. याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संवादात्मक कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकांसाठी आयोजित ‘उच्च शिक्षणातील पालकत्व’ या विशेष मार्गदर्शनपर चर्चासत्रात डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी - निवृत्त उपजिल्हाधिकारी तसेच मानसतज्ञ व समुपदेशक यांनी मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनीही विद्यापीठाबरोबर हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. यानंतर प्रख्यात कलाकार प्रत्यक्ष राजभट्ट यांच्या थरारक ‘रावणा’ सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांच्या ‘बहुमुखी’ विकासाठी विद्यापीठाची बांधिलकी अधोरेखित करणारा हा स्वागत समारंभ विद्यार्थी आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने अविस्मरणीय ठरला.
0 Comments