ओटीएस' योजनेस २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेती व बिगरशेती थकित कर्जदारांसाठी राबवण्यात येणाऱ्या एकरकमी परतफेड योजनेस (ओटीएस) ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा ठराव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गुरुवारी (ता.२१) झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक कुंदन भोळे होते. प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील शाखांची दुरवस्था लक्षात घेता, त्या आधुनिक करण्यासाठी बैठकीची सुविधा, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, रंगरंगोटी व बोर्ड दुरुस्तीची मागणी कमलाकर सोनकांबळे यांनी सभेत केली. प्रशासकांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले.
सहकार कायद्यातील कलम ८८ अंतर्गत माजी संचालक व अधिकाऱ्यांविरोधात वसुलीची कार्यवाही करण्याचा ठरावही सभेत एकमताने मंजूर झाला. याशिवाय, सरकोली येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या थकबाकी वसुलीसाठी कलम १०१ नुसार जिल्हा बँकेने सहकार्य करावे, अशी मागणी प्रतिनिधी हणमंत भोसले यांनी केली.
ओझेवाडी (ता. पंढरपूर) येथे बँकेची नवीन शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी ओझेवाडी सेवा संस्थेचे प्रतिनिधी पंडित भोसले यांनी सभेत केली. कुंदन भोळे यांनी प्रतिनिधींना उत्तर देताना, बँकेने राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
प्रशासकाला मुदतवाढ देण्याचा ठराव
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी (ता.२१) बँकेच्या प्रशासक कुंदन भोळे यांच्या कार्यकाळात बँकेची प्रगती आणि विश्वासार्हता वाढल्याचे नमूद करत, त्यांचा कार्यकाळ आणखी दोन वर्षांनी वाढवावा, अशी ठरावाद्वारे मागणी करण्यात आली. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार असून, सभेतील बहुसंख्य प्रतिनिधींनी यास पाठिंबा दिला.
0 Comments