सोलापूर जिल्ह्यात सलग पावसामुळे शेतीचे नुकसान
महाराष्ट्रात पावसाचं तुफान, राज्यभरात 16 जणांचा मृत्यू
सोलापूर (सचिन जाधव):- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सलग जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर अधिक वाढल्याने शेतातील उभे पीक पाण्यात गेल्याचे चित्र आहे. विशेषतः भात, सोयाबीन, आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
काही ठिकाणी नाल्यांना पूर आल्याने शेतीचे पाणी बाहेर निघण्यास अडथळा निर्माण झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. ऑगस्ट महिन्याची पावसाची सरासरी १०७ मिलिमीटर आहे. पण पहिल्या पंधरवड्यातच ११७ मिलिमीटर पावसाने महिन्याची सरासरी ओलांडली आहे.
सोलापुरात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी तालुक्यातील बक्षी अनेक भागात सर्वत्र पाणी आले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परिश्रमाने जोपासलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मागील चार दिवसात तर त्याचा जोर आणखीनच वाढला आहे. या पावसामुळे या भागात नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे अनेक गावात नदी आणि ओढ्यांना पूर सदृश परिस्थिती आली आहे. नदी- ओढ्यांवर आलेल्या पुरामुळे बक्षी हिप्परगे ते सोलापूर जिल्ह्यातील वरळेगांव, वडजी आणि मराठवाड्यातील सीमावर्ती भागातील खडकी धोत्री या मार्गाची वाहतूक खंडित झाली आहे.
मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणी साचले असून, त्यामुळे खरिपातील तूर, उडीद, सोयाबीन, मुग यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उत्तर सोलापुरातील नान्नज, मार्डी, कारंबा, वडाळा, पडसाळी, गुळवंची या भागातील अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाने पंचनामा सहकार्य सुरू केले आहे. नुकसानीचे पंचनामे झाल्यावर राज्य शासनाला अहवाल देण्यात येणार आहे, ज्यावरुन शेतकऱ्यांना बँक खात्यांमध्ये थेट भरपाई पाठविण्यात येणार आहे.
सोमवारी पुन्हा पाऊस
गेल्या ४-५ दिवसांपासून सलग पाऊस होत आहे. सोमवारी (ता. १८) पुन्हा पावसाने सकाळपासूनच सुरुवात केली. सलग तिसऱ्या दिवशी सूर्यदर्शनही झाले नाही. दिवसभर मोहोळ, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाची थांबून-थांबून रिपरिप सुरुच होती.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात धुव्वादार पाऊस सुरू आहे.
कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर आला असून लातूर, नांदेड जिल्ह्यात पावसाने मोठं नुकसान झालं असून मनुष्यहानी व जनावरेही दगावल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यभरात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात, मराठवाड्यात 11 जणांचा मृत्यू झाला असून नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे नांदेड जिल्ह्यात पोहोचले आहेत. तर, मुख्यमंत्र्यांनीही मुंबईसह महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी झाली असून पिकं पाण्याखाली गेली आहेत. तर, मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली असून मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेचं दिसून आलं. राज्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने विसर्ग देखील सुरू झाला आहे.
मराठवाड्यात पावसाने 11 जणांचा बळी
मराठवाड्यात 14 ऑगस्टपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये जीवितहानी देखील केली आहे. मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 11 लोकांचा बळी गेला आहे. 498 छोट्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 350 पेक्षा अधिक घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. सोबतच 1154 गावांना पावसाचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील 4 लाख 38हजार 451 शेतकरी पावसामुळे बाधित झाले आहे. तसेच 3 लाख 58 हजार 370.55 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाला आहे.
विदर्भात 50 गावांचा संपर्क तुटला
विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करण्यात आला होता.
गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या परिसरात सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात 12 तालुक्यात 52.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून 15 मंडळात मुसळधार तर 10 मंडळात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सद्यस्थितीत 10 जिल्हा मार्ग बंद असून पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागड-आल्लापल्ली हा राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे. परिणामी तालुक्यातील 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने गडचिरोली शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून आपत्ती व्यवस्थापन करणारी नगरपालिकाच पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, हवामान विभागानुसार 20 तारखे पर्यंत विदर्भातील दक्षिणी जिल्ह्यांमध्ये म्हणजेच यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे. 21 ऑगस्ट पासून मात्र पावसाचा जोर कमी होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
0 Comments