विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीची अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी व साफळे गावांना भेटी
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे समिती प्रमुख आमदार सुहास कांदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली व समितीचा आजचा स्थळ भेटीचा कार्यक्रम अंतिम केला. समितीने स्थळ भेटीसाठी अक्कलकोट तालुक्यातील कोन्हळी, साफळे गावांना भेटी दिल्या.
यावेळी महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समीतीचे सदस्य आमदार उमेश यावलकर, देवेंद्र कोठे, प्रविण स्वामी, अनिल मांगुळकर, अमोल मिटकरी व धीरज लिंगाडे यांची उपस्थिती होती.
उर्वरित समिती सदस्य आमदार सर्वश्री. रत्नाकर माणिकराव गुट्टे, किर्तीकुमार भांगडिया, शंकर जगताप, संतोष बांगर, राजू कारेमोरे, मनोज कायंदे, , ज्ञानेश्वर म्हात्रे, अमोल मिटकरी, सचिन अहिर उद्यापासून समिती सोबत पाहणी दौरे करणार आहेत.
*अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी व साफळे गावांना भेटी -
समितीने अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी
येथील आश्रम शाळेला भेट दिली. यावेळी समिती प्रमुख व सदस्य यांनी आश्रम शाळेची पाहणी केली तसेच वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी तसेच शिक्षक वर्गाशी संवाद साधला. समितीने विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येते का याची माहिती घेतली तसेच काही विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात वर्गातील बोर्डावर लिहिण्यास सांगितले तसेच काही विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यासोबत खाली बसून विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेची माहिती घेतली. तसेच उजळणी, पाढे विद्यार्थ्यांना येतात का याचीही समिती सदस्यांनी खात्री केली. त्याप्रमाणे समिती प्रमुख व सदस्यांनी शिक्षक वर्गाशी संवाद साधून विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने तसेच शासकीय नियमाने शैक्षणिक उपक्रम तसेच सकाळचा नाष्टा दुपारचे व रात्रीचे जेवण तसेच अन्य सोयीसुविधा व्यवस्थित दिल्या जात आहेत की नाही याविषयी जाणून घेतले. तसेच संस्थेच्या वतीने संपूर्ण शासकीय निकष पूर्ण केले जात आहेत की नाही याविषयी समितीने माहिती घेतली.
त्याप्रमाणे समितीने अक्कलकोट तालुक्यातील साफळे येथील महादेव काशीराया पाटील प्राथमिक आश्रम शाळेस भेट देऊन येथील विद्यार्थ्यांशी व शिक्षक वर्गाशी संवाद साधून येथे देण्यात येत असलेल्या शैक्षणिक व अन्य सुविधाची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगती अहवाल समजण्यासाठी समिती प्रमुख व सदस्यांनी काही विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून माहिती जाणून घेतली. समितीने या संस्थेच्या स्वयंपाक गृहाची ही पाहणी करून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराची गुणवत्ता व दर्जा याची माहिती घेतली.
समितीचे 20 व 21 ऑगस्ट रोजी चे कार्यक्रम
बुधवार, दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते 2 वाजता स्थळांना भेटी देणे. दुपारी 2.00 ते 3.00 वाजता राखीव. दुपारी 3 ते 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोलीस अधीक्षक कार्यालय, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा व नगरपंचायती, प्रादेशिक परिवहन कार्यालय, औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, कृषी अधीक्षक कार्यालय, पशुसंवर्धन कार्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ, अधीक्षक व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सोलापूर यांचे आस्थापनेवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी/कर्मचारी यांची भरती, आरक्षण व अनुशेष तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ याबाबत बैठक घेतील.
गुरुवार, दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते 2 वाजता. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय, जात पडताळणी समिती तसेच जिल्हा परिषद कार्यालय, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण उपायुक्त/सहायक आयुक्त समाज कल्याण, सोलापूर यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी / कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण व अनुशेष तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाकरीता राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य सचिव जात पडताळणी समिती, स उपायुक्त व सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्यासमवेत बैठक.
दुपारी 2.00 ते 3.00 वाजता राखीव. दुपारी 3 ते 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे समितीने विविध प्रकल्प व कामांच्या केलेल्या पाहणी दरम्यान समितीच्या निर्देशनास आलेल्या काही प्रमुख बाबींसदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
तपासणी
विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती ही जिल्ह्यातील संबंधित शासकीय विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी देऊन विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी कर्मचारी यांच्या भरती, भरती आरक्षण व अनुशेष तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना इत्यादी संदर्भातील अद्यावत माहितीची पाहणी करून शासकीय निकषाप्रमाणे याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे की नाही याची तपासणी करणार आहे.
यावेळी समिती समवेत बैठकीस व पाहणी दौऱ्यास अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, इतर बहुजन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गणेश सोनटक्के, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी विना पवार, अक्कलकोट तहसीलदार विनायक मगर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
0 Comments