रिपरिप पावसाने फळबागांना बसतोय फटका
पंढरपूर तालुक्यात सलग तीन दिवस पाऊस; ऊस, मका पिकांना लाभदायी
पंढरपूर : (कटूसत्य वृत्त):- गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसामुळे शेतातील ऊस, मका, कडवळ यांना फायदा होत असला तरी पेरु, बोर, डाळींब, शेवगा आदी फळबागांना फटका बसू लागला आहे. फळबागांच्या मोहोरात पाणी साचून राहत असल्याने मोहोर कुजत आहे. तर द्राक्षे, डाळींब, बोर फळांवर कुजवा, दावण्या, मर, तेल्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. तर औषध फवारणी सातत्याने करावी
लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडू लागले आहेत.
चालू पावसाळ्यात जूनच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. मका, कडवळ, ऊस शेतात जोमाने डोलत आहे. तर द्राक्षे, डाळींब, बोर आदी फळबागादेखील उत्तम फुलल्या आहेत. परंतु, अशातच मागील दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे मका, ऊस, कडवळ या पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गम असल्याचे चित्र दिसून
येत आहे.
गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला पंढरपूर भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. तर गणरायाच्या
आगमनालादेखील पाऊस आला. सलग तीन दिवस तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. सलग तीन दिवस पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग आनंदीत आहे. मात्र, रिपरिप नको, पाऊस मोठा कोसळावा असे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे. रिमझिम पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना पावसामुळे कामाला मुकावे लागत आहे.
रिपरिप पाऊस सुरू असल्याने फळबागांवर औषध फवारणी करता येत नाही. जर केलीच तर त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. तसेच बोर, डाळींब, द्राक्षे बागांच्या औषध फवारणीसाठी येणारा खर्च अधिक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होताना दिसत आहे. तीन दिवस झाले सूर्यदर्शन झाले नाही. ढगाळ वातावरण व अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी येत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऐन सणासुदीत पाऊस सुरू झाल्याने त्याचा फटका बाजारपेठेवरही बसत आहे.
चौकट
रस्ते झाले चिखलमय
सलग तीन दिवस पाऊस सुरू असल्याने या हलक्या व रिमझिम पावसामुळे
शहरातील उपनगरीय भागांसह ग्रामीण भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयात
पाणी साचले आहे. तर खडीकरण व मुरमीकरण केलेले रस्ते चिखलमय झाले
आहेत. रस्ते चिखलमय झाल्याने मालवाहतूक करणारी वाहने, स्कूल बस,
दुचाकी अडकून पडत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे ग्रामपंचायतींनी
रस्ते मुरमीकरण करावेत, अशी मागणी होत आहे.
0 Comments