सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पोळा सणासाठी बैलांच्या मिरवणुका काढण्यासाठी अनेकदा डिजेचा वापर केला जातो. मात्र याचा जनावरांना मोठा त्रास होतो. याबरोबरच शेतकऱ्यांनी बैलाची शिंगे तासल्याने व रासायनिक रंग लावल्यामुळे बैलांच्या डोळ्यांना इजा होते. यामुळे अनेकदा कॅन्सर होण्याचा धोका असल्याने बैलांच्या शिंगांना रासायनिक रंग लावणे तसेच शिंगे तासणे टाळा असे आवाहन ॲनिमल राहत या संस्थेने केले आहे.
ग्रामीण भागात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. पूर्वी नैसर्गिक पद्धतीने साजरा होणारा जायचा पण काळाच्या ओघात पोळा साजरा करण्याची पद्धत बदलत गेली. बैलांना सजविण्यासाठी त्यांची शिंगे तासने, शिंगाला आणि शरीरावर रासायनिक रंग लावणे त्यांना डिजेसमोर मिरवणुकीत तासन्तास उभे करणे.
या सर्व चुकीच्या पद्धती मुळे बैलांना वेगवेगळे आजार होतात. यासाठी अशा गोष्टी टाळण्यासाठी ॲनिमल राहत या संस्थेकडून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
पुढील बाबीचा अवलंब करा..
१. शिंगे तासू नका. इंगूळऐवजी रंगीत रिबिन वापरा.
२. बैलांना रासायनिक रंग न लावता नैसर्गिक फुलांनी सजवा
३. डिजेच्या मोठ्या आवाजासमोर उभे करणे टाळा.
४. बैलांना जबरदस्तीने नाचवू नका.
५. मिरवणुकीत मोठ्या आवाजाचे फटाके वापरू नका.
६. महत्वाचे म्हणजे त्यांना भरपूर आराम द्या.
७. पुरेसा आहार व पाणी उपलब्ध करून द्या.
८. वेसणीऐवजी म्होरकीचा वापर करा.
९. दोन दाव्याऐवजी एक दावे वापरा.
१०. बैल व इतर जनावरांना दररोज खररा करा.
जनजागृती व मोफत उपचार
ॲनिमल राहत संस्थेच्या वतीने जिल्ह्यात सोलापूर व पंढरपूर येथे बैल घोडा, गाढव व कुत्रा या प्राण्यांची तपासणी व मोफत औषध उपचार केले जातात. प्राण्यांप्रती
प्रेमभावना वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत जनावरांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ॲनिमल राहत, सोलापूर (मो. ९५५२५५२०४८) यांच्याशी संपर्क साधावा.
पोळा सण बैलांचा गौरव करण्यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो. बैलांना अनैसर्गिक शिक्षा करण्यासाठी नसतो. त्यामुळे पोळा साजरा करताना बैलांना त्रास होईल, त्यांच्यावर अन्याय होईल अशा कृती टाळा.
डॉ. आकाश जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी, ॲनिमल राहत
0 Comments