माकपचे राज्यस्तरीय अभ्यास शिबिर सोलापूर येथे उत्साही वातावरणात सुरू
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- अखंड लढा व श्रमिकांच्या त्यागातून उभी राहिलेली ३० हजार असंघटीत कामगारांची वसाहत रे नगर आज जगात पथदर्शी ठरत आहे. या क्रांतिकारी नगरीत महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झालेल्या लढाऊ कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण घडविण्यासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे महाराष्ट्र राज्यस्तरीय तीन दिवसीय अभ्यास शिबिर उत्साही वातावरणात सुरू झाले.
शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट रोजी या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी लाल झेंडा फडकावून शहिदांना अभिवादन करण्यात आले. प्रजा नाट्य मंडळाच्या कलावंतांनी क्रांतिकारी गीते सादर केली.
“लाल झेंडे को लाल सलाम!, शहिदोंके अरमानोंको मंझिल तक पहुंचाएंगे!, साम्राज्यवाद मुर्दाबाद!, सांप्रदायिकता हो बरबाद!, दुनिया के मजदूर एक हो!” अशा जोरदार घोषणांनी यावेळी रे नगर परिसर दणाणून गेला.
सोलापूर जिल्ह्यातील नकोच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्ष व जनसंघटना मजबूत ठेवण्याचे अभूतपूर्व कार्य केले असल्याचे गौरवोद्गार माकप पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. डॉ. अशोक ढवळे यांनी प्रतिनिधी आणि उपस्थितांसमोर बोलताना यावेळी काढले. आणि “जनक्रांतीसाठी जनतेचा सहभाग अनिवार्य आहे. त्यांच्या राजकीय प्रबोधनाचे तंत्र हे अभ्यास शिबिर आत्मसात करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंचावर केंद्रीय समिती सदस्य कॉ. बादल सरोज, राज्य सचिव डॉ. अजित नवले, राज्य सचिवमंडळ सदस्य विजय गाभणे, ॲड. एम. एच. शेख, सुनील मालुसरे, शैलेंद्र कांबळे आणि किरण गहला, जिल्हा सचिव युसूफ मेजर, आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान राज्य सचिवमंडळ सदस्य शुभा शमीम यांनी भूषविले. राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी प्रास्ताविक केले, तर ॲड.एम.एच.शेख यांनी प्रतिनिधींचे स्वागत करून, दिवंगतांना आदरांजलीचा शोकप्रस्ताव मांडला.
सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने डॉ. अशोक ढवळे व कॉ. बादल सरोज यांचा सोलापुरी श्रमिकांच्या श्रमाचे प्रतीक असलेली चादर देऊन सत्कार करण्यात आला.
0 Comments