अकलूज येथे नवीन पासपोर्ट सेवा केंद्राची मागणी
खा. मोहिते-पाटील यांची केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन अकलूज येथे पासपोर्ट सेवा केंद्र (पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र - POPSK) स्थापन करण्याची मागणी केली.
खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले की, अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र आहे. सध्या अकलूजमध्ये पासपोर्ट सेवा उपलब्ध नसल्याने माळशिरस तालुक्यातील सीमावर्ती भगातून स्थानिक नागरिकांना माढा (१०० किमी) दूर असलेलेया केंद्रांवर जावे लागते. या केंद्रांवर अतिरिक्त ताण असल्याने अपॉइंटमेंटसाठी १५ दिवसांहून अधिक प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो.
अकलूज येथे पासपोर्ट सेवा केंद्र उपलब्ध झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, विशेषत: विद्यार्थी, व्यावसायिक आणि परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांना याचा फायदा होईल. यावेळेस केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे अकलूज आणि परिसरातील नागरिकांमध्ये नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
0 Comments