Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात दमदार पावसाने खरिपाला जीवदान

 सोलापूर जिल्ह्यात दमदार पावसाने खरिपाला जीवदान




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर व जिल्ह्यातून गायब झालेला पाऊस अखेर मंगळवारपासून (ता. २२) परतला आहे. मंगळवारी सायंकाळपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सोलापूर शहर व परिसरात गेल्या २४ तासात ५४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सरासरी १७.६ मिमी पावसाची आज नोंद झाली. या पावसामुळे चोहीकडे पाणी पाणी झाले आहे. आज दिवसभर सोलापुरात पावसाने अधून-मधून हजेरी लावल्याने आज दिवसभर पावसाळी वातावरण होते.

यावर्षी जूनपासून पावसाने दडी मारली होती. जुलैचा निम्मा महिना संपला तरीही मुसळधार पाऊस हजेरी लावत नसल्याने खरिपाची पिके धोक्यात येऊ लागली होती. पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने खरिपाच्या पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे.

शुक्रवारपासून (ता. २५) श्रावण सुरू होत आहे. श्रावणाच्या अगोदर पावसाने दमदार हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० या चोवीस तासात ५४.४ मिमी पावसाची नोंद झाली. आज सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ५.० मिमी पावसाची नोंद झाली.

जुलैमधील सर्वाधिक पावसाचा दिवस

जुलै महिन्यात आतापर्यंतच्या २३ दिवसांमध्ये पावसाचे सरासरी दिवस ८ ठरले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक ८.६ मिलिमीटर सरासरी पाऊस मंगळवारी (ता. २२) नोंदविला गेला आहे. त्यानंतर सर्वाधिक १७.६ मिलिमीटर पावसाची नोंद बुधवारी (ता. २३) झाली आहे. जुलैमधील सर्वाधिक पावसाचा हा दिवस ठरला आहे. जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरी ९४.८ मिलिमीटर पाऊस होतो, आतापर्यंत ६१.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस

सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी करमाळा वगळता सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. उत्तर सोलापूर तालुक्यात ३९.७, दक्षिण सोलापूर तालुक्यात ३३.३, बार्शी तालुक्यात ३.३, अक्कलकोट तालुक्यात ४९.१, मोहोळ तालुक्यात २७.३, माढा तालुक्यात ३.८, पंढरपूर तालुक्यात १५, सांगोला तालुक्यात ७.३, माळशिरस तालुक्यात ५.२, मंगळवेढा तालुक्यात २७.६ असा एकूण जिल्ह्यात सरासरी १७.६ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments