७० फूट रोड येथील विक्रेत्यांवरील कारवाई थांबवा
अन्यथा पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना भाजी विक्रेते घेराव घालणार- आडम मास्तर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील 70 फूट रोडवरील भाजी विक्रेत्यांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. यामुळे रोजी-रोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. तत्काळ विक्रेत्यांवरील कारवाई थांबवावी. या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला आहे. न्याय न मिळाल्यास पंढरपूर पूजेवेळी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भाजी विक्रेते घेराव घालतील, असा इशारा माकपाचे माजी आ. नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
70 फूट रोडवर बसलेले भाजीपाला, फळ विक्रेते, किरकोळ विक्रेते, फेरीवाले व जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांच्यावर गेल्या 25 दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. यामुळे सुमारे 200 जणांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे. येथील विक्रेत्यांना नियम व अटी लागू करून वाहतुकीस अडथळा न करता व्यवसाय करण्याची अधिकृत परवानगी देण्यात यावी अशी मागणी आहे. या मागणीसाठी लाल बावटा फेरीवाले, चार चाकी व खोके धारक श्रमिक संघटना सीटू संलग्न यांच्यावतीने सोलापूर महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले होते. दरम्यान, पालकमंत्री आणि महापालिका आयुक्तांनी अद्यापही कोणताही तोडगा अथवा निर्णय दिला नाही.
दरम्यान, या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे आल्यानंतर शिष्टमंडळास भेटण्यासाठी वेळ द्यावा याकरिता ई-मेल पाठविण्यात आला आहे. अद्याप या संदर्भात प्रतिसाद मिळाला नाही. चर्चेसाठी वेळ न दिल्यास अखेर पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना सुमारे दोनशे भाजी विक्रेते घेराव घालतील. प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारीही विक्रेत्यांनी केली आहे, असे माजी आ. आडम यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासन नगर विकास विभागामार्फत पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) योजना 2017 या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेस नलिनी कलबुर्गी, युसूफ मेजर, ॲड. अनिल वासम, जाफर शेख, खाजा करजगी, रुक्मिणी कांबळे आदी उपस्थित होते.
0 Comments