हवेली क्र.३ चे तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधक पवार तुकडाबंदी कायदा भंग प्रकरणात अडचणीत
२७ दस्तांमध्ये गैरप्रकार उघड
पुणे (कटूसत्य वृत्त):- हवेली क्र. ३ चे तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधक गणपत पवार यांनी पदाचा गैरवापर करत तुकडाबंदी कायद्याचा भंग केल्याचा गंभीर निष्कर्ष चौकशी अहवालातून समोर आले आहेत. स्वाभिमानी ब्रिगेडचे अध्यक्ष रोहन सुरसे-पाटील यांच्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला आहे.
रोहन सुरसे-पाटील यांनी ४ जून २०२५ रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हवेली तालुक्यातील विविध जमिनींच्या ३५ खरेदी-विक्री दस्तांची चौकशी करण्यात आली होती. यापैकी २७ दस्तांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकशी अहवाल सह जिल्हा निबंधक वर्ग-२ यांनी वर्ग-१ यांच्याकडे सादर केला असून, तो आता नोंदणी व मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांकडे कारवाईसाठी पाठवला जाणार आहे. तपासणीमध्ये संबंधित दस्तांमध्ये सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगी न घेता दस्त नोंदविण्यात आला आहे. तसेच त्यात मंजूर नकाशा जोडलेला नाही. त्यामुळे तुकडाबंदी कायद्याच्या स्पष्ट अटींचा भंग झाला आहे. यामुळे महसूल आणि नोंदणी विभागातील कामकाजातील गंभीर त्रुटी समोर येत आहेत.
शहरालगतच्या हडपसर, लोहगांव, महंमदवाडी, कोलवडी, लोणी काळभोर, मांजरी बु., कोंढवा, सुस, वाघोली, उरुळी देवाची, आंबेगाव बु., आव्हाळवाडी या भागांतील जमिनीच्या साठेखत प्रकरणांची चौकशी करण्यात आली होती. प्लॉटिंग विक्रीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे यातून दिसून येते. शहरालगतची अनेक दस्त नोंदणी आर्थिक तडजोडीच्या आधारे ४०० ते २ गुंठ्यांपर्यंतच्या प्लॉट्ससाठी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी होत आहे.
चौकट
तुकडाबंदी कायदा अस्तित्वात असतानाही नोंदणी कार्यालयातून मोठ्या प्रमाणात त्याच्या अटींचे उल्लंघन केले जात असल्याचे उघड झाले आहे. तडजोडीच्या आधारे ४५० ते २ गुंठ्यांपर्यंतच्या बेकायदा दस्तांची नोंदणी केली गेल्याचे निदर्शनास आले आहे. हवेली क्र. ३ चे तत्कालीन अधिकारी गणपत पवार यांनी नोंदविलेल्या ३५ दस्तांपैकी २७ दस्तांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा चौकशी अहवाल लवकरच नोंदणी व मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांकडे पाठवला जाणार असून, त्यांनी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आहे.
- रोहन सुरसे-पाटील, अध्यक्ष स्वाभिमानी ब्रिगेड, पुणे.
0 Comments