मनोरंजनासाठी ग्रेट राजकमल सर्कस सोलापूरात उपलब्ध
८२ कलाकारांचे पाहायला मिळणार विशेष कलाविष्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांच्या मनोरंजनासाठी ग्रेट राजकमल सर्कस सोलापुरात सुरू असून त्याचे जुनी मिल कंपाऊड, स्टेशन रोड, सोलापूर येथे दररोज 3 खेळ होत आहेत, अशी माहिती सर्कसचे मालक रफिक शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूरचे सुपुत्र लाडलेसाब शेख यांनी सन १९६९ या साली या सर्कसची निर्मिती केली होती. सोलापुरातील वारद कंपाऊड येथे या सरकारचे प्रारंभिक खेळ झाले होते. गत 56 वर्षापासून या सर्कसची सेवा सुरू आहे. लाडलेसाब शेख यांचे नातू रफिक शेख यांनी सध्या या व्यवसायाची परंपरा सुरू ठेवली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे सर्कस सोलापुरात पुनश्च आले आहे.
जुनी मिल कंपाऊड, स्टेशन रोड, सोलापूर येथे दररोज या सर्कसचे तीन खेळ सुरु आहेत. दुपारी १ ,४ व सायंकाळी ७ असे एकूण तीन शो होत आहेत. हे महाराष्ट्राचे एकमेव मराठी सर्कस आहे. या सर्कसमध्ये एकूण ८२ कलाकार असून ते आपापल्या कामगिरीत निपुण आहेत. त्याचबरोबर सर्कसमध्ये ५५ फुटावर हवाई झुला, हायस्पीड मोटार सायकल, जंप, इंडिया गॉट टॅलेंटचे विनर मणिपुरी ग्रुप त्याचबरोबर फायर ॲक्ट, हुल्ला हुप रिंग डान्स, अरेबियन डान्स, तलवार स्टंट आहे. खास लहान मुलांसाठी जोकरांचे विदुषी व हास्यास्पद मनोरंजन याचे आकर्षण आहे. प्रेक्षकांना कार्टुन्सबरोबर सेल्फी घेण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सध्याच्या मोबाईल व सोशलमिडीयाच्या युगात सर्कसची कला लुप्त होत चालली आहे.ही कला लुप्त होण्यापासुन वाचविण्यात सोलापूरकरांनी सर्कसचे खेळ पाहून आपले योगदान द्यावे, असे आवाहन रफिक शेख यांनी केले आहे.
बालकलाकार, प्राणीबंदीमुळे सर्कस व्यवसायावर मोठा परिणाम
सन 1998 पासून शासनाने सर्कसवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली. सर्कसमध्ये बालकामगार, प्राण्यांना काम करण्यास शासनाने बंदी घातल्याने सर्कसवर मोठा परिणाम झाला आहे. अतिशय बिकट परिस्थितीत हा व्यवसाय सुरू आहे. सर्कस व्यवसाय तग धरून राहण्यासाठी घोडा, उंट यासारख्या देशी प्राण्यांना सर्कसमध्ये काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी रफिक शेख यांनी केली.
केरळ धर्तीवर सर्कसच्या कलाकारांना मानधन द्यावे
दिवसेंदिवस सर्कसचा व्यवसाय कमीच होत चालला आहे. त्यामुळे सर्कसचे चालक व कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केरळ सरकारकडून तेथील सर्कसच्या कलाकारांना मानधन दिले जाते. या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्कसच्या कलाकारांना मानधन द्यावे. असे झाल्यास कलाकारांना मोठा दिलासा मिळेल व सर्कसचा व्यवसाय टिकून राहण्यास काही प्रमाणात मदत होईल, असे रफिक शेख यांनी सांगितले.
0 Comments