सुप्रसिद्ध नाट्य सिने-अभिनेते भरत जाधव यांना ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
पुणे (कटूसत्य वृत्त):- नाट्य व चित्रपट सृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे अभिनेते भरत जाधव यांना यंदाचा ‘कलामहर्षी चित्रसूर्य कै. बाबुराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.
सत्यारंभ संस्था, पुणे यांच्या वतीने, तसेच पद्मश्री शंकरबापू आपेगावकर ट्रस्ट, निर्मिती मीडिया सोल्युशन्स आणि आदित्यराजे मराठे प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन हडपसर येथील कै. रामचंद्र बनकर क्रिडा संकुल, गंगानगर, हडपसर येथे करण्यात आले होते.
सत्यारंभ नाट्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत सुतार यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडत पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष म्हणून शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी उपस्थित राहून भरत जाधव यांना गौरवचिन्ह प्रदान केले. रमाकांत सुतार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये सुनिलदादा बनकर, आदित्यराजे मराठे, वैशाली बनकर, रोहित बेलदरे, डॉ. शंतनू जगताप, विजय मोरे, नलिनी मोरे, प्रणव मोरे, रोहिणी भोसले, प्रशांत बोगम आदींचा समावेश होता.
कार्यक्रमात चित्रपट, समाजकार्य, उद्योग, शिक्षण, साहित्य व अभिनय क्षेत्रातील ३० हून अधिक व्यक्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये दिलीप ढगे, नितीन पाटील, रुपाली गुरव, रोहिणी भोसले, राजेश भुजबळ, तानाजी चोरघे, प्रशांत मांढरे, रोहित बेलदरे, आदित्याराजे मराठे, कृपाल पलुसकर, पितांबर धिवार, अमित आदमाने आदींचा समावेश होता.
विशेष म्हणजे ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर दादा खेडेकर यांनाही ‘कलारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अभिनेते भरत जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना, “ही सन्मानाची भावना माझ्या संपूर्ण कलाजगतातील वाटचालीतील प्रेरणादायी ठरेल. बाबुराव पेंटर यांचे नाव समोर आल्यावर अधिकच जबाबदारीची जाणीव होते,” असे सांगितले.
कार्यक्रमाच्या आयोजनात देविदास झुरुंगे, विवेक गपाट, विनोद पडेलकर आदी मान्यवरांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे संचालन शिवराम कांबळे यांनी केले. स्वागताध्यक्ष मनोगत सुनिलदादा बनकर यांनी, तर आभार प्रदर्शन अमोल कुंभार यांनी व्यक्त केले.
0 Comments