सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- शहरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या तसेच घाण करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करा. दंड भरण्यास नकार देत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी बैठकीत आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत.
सोलापूर शहरातील स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छ सोलापूर- सुंदर सोलापूर राखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी महापालिकेत सर्व आरोग्य निरीक्षक मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सोलापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच प्रसंगी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे सक्त आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यावेळी दिले. यावेळी आयुक्तांनी स्वच्छता मोहिमेचाही आढावा घेतला.
सोलापूर शहरात बहुतांश भागात साचलेला तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी टाकलेला कचरा पावसामुळे जागेवर कुजून त्यामुळे दुर्गंधी पसरून शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने महापालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार
यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील १ ते ८ विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या शहरातील सर्व कार्यक्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेमध्ये दैनंदिन शहर स्वच्छतेच्या कामकाजाव्यतिरिक्त शहरामधील विविध भागामध्ये आढळून आलेल्या कचऱ्याचे ढीग हटविण्यात आले. रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून टाकण्यात आलेला कचरा वाहनांद्वारे संकलित करण्यात आला. या मोहिमेदरम्यान दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजानंतर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत ही मोहीम यापुढेही अशीच चालू राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर व परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी शहरात स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केले आहे.
स्वामी विवेकानंद प्रशाला यासह इतर शाळांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात आली. अस्वच्छतेमुळे होणारे परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले.
चौकट
सोमवारी ६२ टन कचरा संकलित
महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये १ ते ७ जुलै दरम्यान सात दिवसांत एकूण ४४१ लोकांवर दंडात्मक कारवाई करून ९८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सोमवार, ७ जुलै रोजी एकूण ६२ टन कचरा संकलित करण्यात आला. कचरा साठलेली ४५ ठिकाणे हटविण्यात आली आहेत. त्या ठिकाणी रांगोळी काढून स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूरचा संदेश दिला, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली.
0 Comments