Hot Posts

6/recent/ticker-posts

अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेची व्यापक तयारी

 अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेची व्यापक तयारी

अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):- गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरीत येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता यंदा प्रशासनाने नियोजनबध्द आणि तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज अशी तयारी सुरू केली आहे. भाविकांची अचूक गणना करण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वारात चार ठिकाणी डिजिटल कॅमेरे बसविण्यात येणार असून, नऊ ठिकाणी पार्किंग आणि तीन ठिकाणी मदत केंद्रांचीही स्थापना होणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.


दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येणार असल्याचे गृहीत धरून प्रशासनाने डिजिटल यंत्राद्वारे गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या प्रगटदिनी फक्त एका कॅमेऱ्याच्या साहाय्याने ७२ तासांत अडीच लाख भाविकांची नोंद झाली होती. यावेळी चारही मुख्य प्रवेशद्वारांवर कॅमेरे लावण्यात येणार आहेत, ज्यामुळे गर्दीच्या व्यवस्थापनात अधिक अचूकता

येणार आहे. याची माहिती वरिष्ठ स्तरावरील शासकीय यंत्रणांनाही देण्यात येणार आहे, ज्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना लवकर करता येतील.


वाहतुकीस अडथळा न होता भाविकांना सोयीस्करपणे दर्शन घेता यावे, यासाठी नऊ ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. या ठिकाणी मंगरूळ हायस्कूलसमोरील मैदान, हत्ती तलाव परिसर, शेख नुरुद्दीन बाबा दर्गा पटांगण, मैंदर्गी रोडवरील स्मशानभूमी शेजारील जागा, स्वामी समर्थ हॉस्पिटल परिसर, कांदा बाजार, बसस्थानकाजवळील मल्लिकार्जुन मंदिर प्रांगण, हन्नूर रोडवरील त्रिकोणी जागा इत्यादींचा समावेश आहे.


उत्सव काळात भाविकांना  कोणतीही अडचण भासू नये म्हणून समाधी मठ, वटवृक्ष मंदिर परिसर आणि मंगरूळ हायस्कूल भागात पोलीस मदत केंद्र कार्यरत राहणार आहेत. गर्दीच्या वेळापत्रकात मार्गदर्शन, सुरक्षा व आरोग्यसेवा यासारख्या बाबतीत ही केंद्रे उपयोगी ठरणार आहेत. तांत्रिक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि मदत केंद्रांच्या माध्यमातून भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. गुरुपौर्णिमा हा केवळ धार्मिक उत्सव नसून, श्रध्दा आणि भक्तीचा महामेळा आहे. त्यामुळे अक्कलकोट नगरीतील प्रशासनाने यंदाच्या उत्सवासाठी केलेल्या तयारीमुळे हा सोहळा अधिक सुरक्षित आणि भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.


चौकट 

एकत्रित पाहणी अन् अंमलबजावणीला सुरुवात 

मागील आठवड्यात तहसीलदार विनायक मगर, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, नगरपरिषदेचे अधिकारी व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली होती. त्यानंतर अंतिम आराखडा निश्चित करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे. त्यामुळे यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव अधिक शिस्तबध्द आणि भाविकांसाठी सुलभ होणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments