मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह प्रशासनाच्या कार्याचे कौतुक
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- यंदाच्या आषाढी यात्रेचे नियोजन सर्वोत्कृष्ट झाल्याबद्दल माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे कौतुक करत अभिनंदनाचा ठराव विधानसभेत मांडला.
सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सोमवारी आमदार पाटील यांनी हा अभिनंदनचा ठराव विधिमंडळात मांडला, तेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे हे कामकाज पाहत होते. आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या कामाचे कौतुक केले. यंदाच्या आषाढी वारीमध्ये पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यामध्ये भाविकांच्या सोयीसाठी जर्मन हँगर पध्दतीचे वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले होते. तसेच भाविकांसाठी चरणसेवा देण्यात आली, फूट मसाज करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आली होती.
या यात्रेत स्वच्छतेवर सर्वाधिक भर देण्यात आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही एकादशीपूर्वी पंढरपूरला येऊन नियोजनाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. यासाठी पाटील यांनी त्यांचे विधिमंडळात कौतुक केले. यापूर्वीच्या यात्रा कालावधीत नियोजनावर नेहमीच टीका होत असे, मात्र यंदा पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात यंत्रणा लावून आषाढी यात्रा भाविकांसाठी सुखकर केल्याबद्दल पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव त्यांनी सभागृहात केला.
आमदार पाटील यांनी सभागृहात अभिनंदनाचा ठराव मांडला तेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे हे सभागृहाचे काम पाहत होते हेही विशेष आहे.
0 Comments