आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन अचूक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदा मे महिन्यापासून सोलापूरसह राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने पंढरपूरच्या आषाढी वारीवर महापुराचे संकट ओढवले होते. परंतु जिल्हा महसूल प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने विनाव्यत्यय वारी पार पडली. टप्प्याटप्प्याने उजनीतून पाणी सोडण्यात आल्याने चंद्रभागेत लाखों भाविकांनी पवित्र स्नानाचा आनंद लुटला.
पंढरपूर येथे सव्वा लाखाच्यावर पाण्याचा विसर्ग राहिल्यास पुराचा धोका निर्माण होऊन वाळवंटातील मंदिरे, नारायण व्यास झोपडपट्टीसह अन्य भागांत पाणी शिरते. दरम्यान उजनी धरण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच 75 टक्के भरून शंभरीकडे वाटचाल सुरू केली होती. दरम्यान नीरा नदीवरील वीर धरणातून सोडण्यात येणार्या पाण्यामुळे पंढरपुरात पुराच्या धोक्याची पातळी आणखी गडद झाली होती. मांढरदेवी दुर्घटनेनंतर राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा आमंलात आणण्यात आली. जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असून, यंदा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उजनीतील पाणी 70 टक्क्यांच्या वर जाऊ दिली नाही. जसेजसे पाण्याची पातळी वाढेल तसतसे उजनीतून पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. मोठा पाऊस झाल्यास आषाढी वारी होईपर्यंत उजनीतच पाणी साठा करण्यासाठी जागा निर्माण करून घेतली.
जलसंपदा विभागाच्या नियमानुसार 75 टक्के भरल्यानंतर त्यावरील ज्यादा झालेले पाणी पूर नियंत्रणासाठी सोडले जातात. परंतु जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा पूरेपूर वापर करून पाणी पातळी 65 टक्केपर्यंत आणण्याचा प्र्रयत्न केला. दौंडमधून उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग आणि वीरधरणातून नीरा सोडण्यात आलेले पाणी यात समन्वय राखून पाणी पातळी 70 टक्केपर्यंत ठेवण्यात यश आले.
गेल्या तीन दिवसांत पुन्हा उजनीत 82 टक्के पाणी साठा झाला. आषाढी वारी संपल्यानंतर आता वारकरी परंतु लागले आहेत. त्यामुळे पूरनियंत्रणासाठी आता उजनीतून पाणी सोडले जाणार आहे. तर दुसरीकडे आषाढी एकादशी संपताच वीर धरणातून नीरा नदीत रविवारी दि. 6 जुलैपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने दि. 7 जुलै रोजी सकाळी 8 वाजता वीर धरणातून निरा नदीच्या पात्रात अजून 3000 विसर्ग वाढवून एकूण निरा नदीच्या पात्रात 6338 क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आला आहे.
आषाढी वारीत पंढरपुरात सूमारे 15 लाखांहून अधिक वारकरी येतात. वारकरी चंद्रभागेच्या पवित्र जलाने स्नान करतात. वाळवंटात अनेक मंदिरे आहेत. या वाळवंटात सूमारे तीन लाखांहून अधिक भाविक सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदा आषाढी एकादशीच्या आधी दोन दिवस नदीतील पाणी कमी होऊन वाळवंट पूर्ण खुला होण्यासाठी प्रयत्न केले. पाणी वाहून गेल्याने आंघोळीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्याबरोबरच वाळवंटात जागाही उपलब्ध झाली.
मागील अनेक वर्षे आषाढी वारीत येणार्या भाविकांसाठी चंद्रभागा नदीत पुरेशा प्रमाणात पाणी नसायचे. त्यामुळे उजनीतून वारकर्यांना स्नानासाठी तसेच नगरपालिकेच्या पाण्याच्या पाणीसाठी उजनीतून पाणी सोडावे लागत होते. मात्र यंदाची परिस्थिती उलटी झाली. पुरामुळे वारंवार पाणी सोडावे लागले. मे महिन्यांपासूनच मुसळधार पाऊस झाल्याने पूराचा धोका होता. हे टाळण्यासाठी वारंवार पाणी सोडावे लागले.
कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूरयंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आषाढी वारीच्या आधी उजनीतून भिमा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यातून उजनीत जलसाठा करण्यासाठी क्षमता निर्माण झाली. त्यामुळे वारी काळात पुराचे संकट निर्माण होऊ शकले नाही.
0 Comments