यंदाच्या आषाढी वारीने मोडले सर्व विक्रम, AI च्या सहाय्याने केली मोजणी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- विक्रमी होती याचा पुरावा आता थेट यावर्षी वापरलेल्या एआय तंत्रज्ञानाने दिला आहे. आषाढी एकादशी दिवशी सकाळी 6 ते रात्री 12 या कालावधीत तब्बल 27 ते 28 लाख भाविकांचा हेड काउंट नोंद झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे.
यावर्षी आषाढी एकादशीला मुंगीलाही पाय ठेवायला जागा नव्हती. जिकडे पहावे तिकडे फक्त भाविकांचा महासागर लोटल्याचे चित्र होते. आजवरचे आषाढी वारीच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडले आहेत.
यंदा पहिल्यांदाच वापरलेल्या एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडण्यात आलेल्या ड्रोनने या भाविकांची मोजणी केली आणि हा आकडा 27 ते 28 लाख इतका मिळून आला. प्रशासनाने एकाच वेळेला चंद्रभागेकडे येणारा मार्ग दर्शन रांग मंदिर परिसर अशा सहा विभागात ड्रोन सोडून ही माहिती संकलित केली आहे. आषाढी साठी पन्नास हजारापेक्षा जास्त ट्रक, टेम्पो, कार आणि विविध खाजगी वाहने नोंद झाली आहेत. याशिवाय जवळपास सहा हजार एसटी बसेस आणि 100 रेल्वे फेऱ्यातून प्रवासी आले होते.
वाहतूक नियोजनासाठी देखील एआय तंत्रज्ञानाची मदत
विशेष म्हणजे आज द्वादशीला सकाळच्या सहा तासात 95 टक्के वाहने आणि भाविक परतल्याने आता पंढरपूर मोकळे झाले आहे. वाहतूक नियोजनासाठी आज पहाटेपासून शहराबाहेर पडणाऱ्या सर्व सहा मार्गांवर सहा डीवायएसपी दर्जाचे अधिकारी आणि पोलिसांचा फौज फाटा तैनात होते. त्यामुळं लाखो भाविकांना दुपारपर्यंत बाहेर जाताना कोठेही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले नाही. यालाही एआय तंत्रज्ञानाची मदत उपयोगी पडल्याने योग्य नियोजन झाल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
180 चोरांना पोलिसांच्या माऊली पथकाने घेतलं ताब्यात
आषाढी एकादशीला एकेरी वाहतूक केल्याने मंदिर परिसर प्रदक्षिणामार्ग आणि वाळवंट यापैकी कोठेही चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या नाहीत. संपूर्ण यात्रा कालावधीत कोणतीही दुर्घटना झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. एकादशी दिवशी जवळपास 2700 चुकलेल्या भाविकांना पुन्हा त्यांच्या जवळच्या माणसांमध्ये सोडण्यात आले. गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या जवळपास 180 चोरांना पोलिसांच्या माऊली पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
0 Comments