'एआय'मुळे बंदोबस्त सुकर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढ वारी दरम्यान लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए. आय. आधारित ड्रोन तंत्रज्ञानाचा नियोजनपूर्वक वापर करण्यात आला. यामुळे वारकऱ्यांपर्यंत वेळेत मदत पोहचवता आली. गर्दी नियंत्रण, नियोजन आणि बंदोबस्तासाठीदेखील त्याची खूप मोठी मदत झाली. आषाढी दिवशी अचूक गर्दी मोजली गेली.
आषाढी वारीत यंदा प्रथमच ड्रोन आणि ए.आय. टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याकडे विशेष लक्ष दिले. वारीत येणाऱ्या भाविकांची अचूक संख्या मोजणे, गर्दीचे
नियोजन, वारकऱ्यांना जलद मदत पोहचवणे यासाठी या टेक्नॉलॉजीचा योग्यरित्या वापर करण्यात आला. एकात्मिक नियोजन केंद्राचे काम यामुळे सुकर झाले. वारीत एकूण १५ ड्रोन वापरले गेले. त्यातील सहा ड्रोन ए.आय. टेक्नॉलॉजीवर आधारित होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यापासून ते आषाढीपर्यंत पालखी मार्ग, पालखी तळ, रिंगण सोहळा, ६५ एकर परिसर, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, वाळवंट, पश्चिम महाव्दार, नामदेव पायरी याठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात आला. आषाढी दिवशी सात वेळा या ड्रोनचे उड्डाण करण्यात आले. गर्दीचे नियोजन, जलद प्रतिसाद आणि सूचना देण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. यामुळे आषाढीदिवशी मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांना सुविधा मिळू शकल्या. पोलिसांना बंदोबस्तासाठीही याचा फायदा झाला. ज्याठिकाणी आवश्यकता असेल, त्याठिकाणी माहिती नियंत्रण कक्षामार्फत देण्यात आली. यामुळे तेथे लवकरात लवकर पोहचणे शक्य झाले. ज्या वारकऱ्यांना सुविधा तसेच वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल त्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात आली. आषाढी वारी दिवशी अचूक गर्दी मोजली गेली. आषाढी वारीत अनधिकृत ड्रोनचा वापरही होतो. यंदा पोलिसांच्या ड्रोनमुळे ३२ अनधिकृत ड्रोनला अडविण्यात आले.
'एआय'मुळे गर्दीचा अचूक अंदाज
ए. आय. ड्रोन फुटेजचा थेट वापर करून गर्दीचा अंदाज आणि माहिती गोळा करण्यात आली. ही माहिती इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरवर थेट दाखवण्यात आली. ब्लू फायर लाईव्ह अॅपद्वारे वरिष्ठ अधिकारी मोबाईलवरून परिस्थितीचे थेट निरीक्षण करू शकले. गर्दीचे मोजमाप, उष्णता नकाशे (हिट मॅप), वाहतूक याचे निरीक्षण करून गर्दीला सूचना देण्यासाठी ए.आय. सिस्टीमचा वापर करण्यात आला. प्रत्येक ड्रोनची किमान एक तासापर्यंत तसेच १० किलोमीटरपर्यंत रेंज होती, यामध्ये नाईटव्हीजन कॅमेराचीही सोय होती.
0 Comments