स्टेट बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या 'इतक्या' शाळांमध्ये पूर्वीपासूनच हिंदी भाषा शिकवतात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शाळांमध्ये पहिलीपासूनच तीन भाषा शिकवण्यात येत आहेत. पाहिलीपासून तीन भाषांचा लळा लागलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १० हजाराहून अधिक असल्याची माहिती 'सकाळ'च्या पहाणीतून पुढे आली आहे. सोलापूर जिल्ह्यात सीबीएसई बोर्ड, आयसीएसई व स्टेट बोर्डाच्या (इंग्रजी माध्यमांच्या स्वयंअर्थसहाय्यिता शाळा) सुमारे ३०० शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी अनेक वर्षांपासून इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकत आहेत. त्यातील एकाही पालकाने त्यासंदर्भात तक्रार केली नसल्याची बाब देखील पुढे आली आहे. दरम्यान, उर्वरित शाळांमध्ये मात्र पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा दोनच भाषा शिकवल्या जाणार हे स्पष्ट झाले आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय झाला होता. पण, हिंदी भाषेच्या कथित सक्तीवरून राजकीय गदारोळ झाला आणि शासनाने शिक्षण खात्याचे निर्णयच रद्द केले. आता समिती नेमून त्यावर अभ्यास होईल, पण समिती अजून नेमलेली नाही. समितीचा अहवाल यायला किमान तीन महिने लागणार असल्याने 'एससीईआरटी'ने पूर्वीचे परिपत्रक रद्द करून सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात सर्वसामान्यांची मुले शिकतात त्या शाळांमध्ये पहिलीच्या वर्गासाठी केवळ दोन भाषाच शिकविल्या जातील.
मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाचे त्रिभाषा सूत्रांबद्दलचे शासन निर्णय तूर्तास रद्द केले. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (एससीईआरटी) तिसरी भाषा वगळून अध्यापनाच्या तासिकांचे सुधारित वेळापत्रक शाळांना दिले आहे. दुसरीकडे 'बालभारती'नेही तिसऱ्या भाषेच्या पुस्तकांची छपाई थांबविली आहे.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना यंदा तिसरी भाषा नसेल. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सुधारित वेळापत्रक दिले आहे. त्यात मराठी विषयांच्या तासिका वाढविल्या आहेत. ते वेळापत्रक सर्व शाळांना पोच झाले आहे.
एससीईआरटीने १८ जून रोजी परिपत्रक काढले. पहिलीचा अभ्यासक्रम बदलला असून १७ जूनच्या शासन शुद्धिपत्रकानुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा शिकविली जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार सुधारित विषययोजना, तासिका विभागणी व वेळापत्रकानुसार शाळांमध्ये मराठी, इंग्रजी व हिंदी किंवा इतर भारतीय भाषा आणि गणित, कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण व कार्यशिक्षण असे विषय शिकविले जातील, असे नमूद होते.
'एससीईआरटी'च्या ३ जुलैच्या सुधारित परिपत्रकानुसार आता मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी, इंग्रजी या दोन भाषाच शिकविल्या जातील, असे नमूद आहे. याशिवाय गणित, कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षण अशा विषयांचेही तास होणार आहेत. या सुधारित परिपत्रकात सुधारित वेळापत्रकातून तिसरी भाषा काढून टाकल्याचे स्पष्टपणे दिसते.
0 Comments