उद्धव ठाकरे पक्षाकडून संजय गायकवाड यांना कॅंटीन केसरी किताब'
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विधान भवनातील कॅंटीनमधील कर्मचारी व व्यवस्थापकास मारहाण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कॅंटीन केसरी व कॅंटीन चॅम्पियन किताब अशी उपरोधिक पदवी देत निषेध आंदोलन करण्यात आले.
विधान भवनाच्या आवारातील कॅंटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली. त्याचा कसलाही पश्चात्ताप न झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील हुतात्मा चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)तर्फे आमदार गायकवाड यांच्या बॉक्सिंगपटूचे कार्टून स्वरूपातील व बॉक्सिंग करणारा शेफ या उपरोधिक पोस्टरला कॅंटीन केसरी व कॅंटीन चॅम्पियन किताब देऊन उपरोधिक सत्कार करण्यात आला.
हे आंदोलन शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. याप्रसंगी 'संजय गायकवाडचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय', 'संजय गायकवाडचा धिक्कार असो', अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली.
विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात जेव्हा अळ्या किडे निघतात, त्यावेळी संजय गायकवाड यांना का राग येत नाही किंवा ते संबंधित मंत्र्याला का मारत नाहीत? अशा आमदाराला विधानसभेच्या सभापतींनी बडतर्फ करावे.
- महेश धाराशिवकर, शहरप्रमुख शिवसेना (उबाठा)
0 Comments