Hot Posts

6/recent/ticker-posts

पदवी-पदव्युत्तरचे थांबलेले शिक्षण पूर्ण करता येणार

 पदवी-पदव्युत्तरचे थांबलेले शिक्षण पूर्ण करता येणार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. या वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा २३ सप्टेंबरपासून घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.  दोन सत्र परीक्षांमध्ये किमान ९० दिवसांचे अंतर असावे, हा नियम लक्षात घेऊन परीक्षेची तारीख विद्यापीठाने निश्चित केल्याचे परीक्षा विभागाने सांगितले.

विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालये असून विद्यापीठात ११ संकुले आहेत. त्याठिकाणी पदवी, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. काही विद्यार्थ्यांचे मागच्या वर्षीचे तर काहींचे चालू शैक्षणिक वर्षाचे विषय मागे राहतात. अशावेळी त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण तेथेच थांबते आणि त्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांची ही समस्या असून त्यासाठी विद्यार्थ्यांना वाढीव दोन संधी देण्यासाठी विद्यापीठाने 'एन प्लस-२'चा प्रस्ताव विद्या परिषदेसमोर ठेवला आहे. २८ जुलै रोजी परिषदेच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होणार आहे. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना थांबलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

परीक्षेचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षेचे ड्राफ्ट वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड केले आहे. २३ सप्टेंबरपासून परीक्षा घेण्याचे नियोजन असून परीक्षेचा कालावधी नेहमीपेक्षा आणखी कमी करण्याचा प्रयत्न आहे.

चौकट

एन प्लस-२ म्हणजे काय?
बीए, बी.कॉम., बीएसस्सी अशा पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी तीन वर्षे आहे. त्यानंतर अशा अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाकडून दोन वाढीव संधी मिळतात. 'बीएएलएलबी'ची पदवी पाच वर्षांची असून त्या विद्यार्थ्यांनाही दोन संधी वाढीव मिळतात. दुसरीकडे पदव्युत्तर शिक्षणाचा नियमित कालावधी दोन वर्षे असतो. त्यांनाही दोन संधी मिळतात. पण, वाढीव संधीत अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या किंवा वाढीव संधीच्या कालावधीत परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांना 'एन प्लस-२'मधून आणखी दोन संधी वाढवून दिल्या जातात. त्याचा निर्णय विद्या परिषदेच्या बैठकीत होत असतो.
Reactions

Post a Comment

0 Comments