मराठा समाजाची 18 जुलैला अक्कलकोट बंदची हाक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट तालुक्यात शिवधर्म संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी रविवारी 13 जुलैला शाईफेक करून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील तमाम मराठा समाज बांधवानी मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. वादविवाद नंतर सर्व मराठा समाज बांधवानी एकत्रित येत 18 जुलैला अक्कलकोट बंदची हाक दिली आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बंदची हाक देण्यात आली आहे.
'प्रवीण दादावर हल्ला म्हणजे मराठा समाजावर हल्ला'
प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला म्हणजे समस्त मराठा समाजावर हल्ला, अशी प्रतिक्रिया मराठा समाजातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी देत आहेत. अक्कलकोटमध्ये मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी शुक्रवारी 18 जुलै रोजी बंद पुकारून कडाडून निषेध करणार आहेत. बंदची रूपरेषा अजून ठरलेली नाही. बंदमध्ये मोर्चा काढणार किंवा सभा घेणार यावर अजून निर्णय झाला नाही. पण लवकरच त्यावर निर्णय घेऊन सांगितले जाणार असल्याची प्रतिक्रिया सकल मराठा समाजाचे माऊली पवार आणि मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप कोल्हे यांनी दिली.
'मोक्का लागत नाही तोपर्यंत मराठा समाज गप्प बसणार नाही'
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केलेले सर्व संशयित आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तुरुंगात शिक्षा भोगत असलेले आरोपी पॅरोलवर बाहेर आलेले आहेत. प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणारे संघटीत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होत नाही तोपर्यंत मराठा समाज गप्प बसणार नाही. अक्कलकोट बंद नंतर सोलापूर बंद, त्यानंतर मोठं मोठे मोर्चे काढणार आहेत, अशी प्रतिक्रिया सकल मराठा समाजाचे माऊली पवार, मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप कोल्हे यांनी दिली आहे.
बैठकीत राडा
दरम्यान, सोलापुरात आज पार पडलेल्या बैठकीत मोठा राडा झाल्याचंदेखील बघायला मिळालं. पंढरपूर येथील रोहित रामभाऊ फावडे नावाच्या तरुणाने भाषण करताना जन्मेयजयराजे भोसले यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच या तरुणाने जन्मेयजयराजे भोसले यांच्या मुलाबाबत एक वक्तव्य केलं. यामुळे मराठा समाजाचे दोन गट भर बैठकीत आमनेसामने आले. यावेळी मोठा राडा झाला. या गोंधळानंतर बैठकदेखील पार पडली. या बैठकीत 18 जुलैला अक्कलकोट बंदची हाक देण्याचा निर्णय घेण्यात आला.
0 Comments