सांगोला तालुक्याच्या विविध मागण्यांवर विधानसभेत आ. डॉ. देशमुखांनी वेधले लक्ष
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला विधानसभेचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत बोलताना सांगोला शहर आणि तालुक्यातील विविध विकासकामे, नागरी समस्या, शैक्षणिक व आरोग्य विषयक अडचणी तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात सरकारचे लक्ष वेधत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.
शहरातील भुयारी गटारीच्या कामामुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी मिळणारा निधी अपुरा असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी सरकारकडे निधी वाढवून देण्याची मागणी केली. सध्या सांगोला नगरपालिकेला साधारणतः ३ कोटींचा निधी मिळतो. तो वाढवून देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
काय आहेत मागण्या?
ट्रॉमा केअरसेंटर सुरु करण्याची मागणी
शहरातील ट्रॉमा केअर सेंटरची इमारत पूर्ण झाली असून आवश्यक पदांची भरती करून तसेच उपकरणांची पूर्तता करून हे केंद्र तातडीने सुरु करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
शाळा आणि आंगणवाड्यांसाठी निधी
तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा व आंगणवाड्यांच्या इमारती जीर्ण अवस्थेत असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, असेही त्यांनी सभागृहात सांगितले.
ग्रामपंचायती व रस्त्यांसाठी निधी
स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेतून प्रस्तावित ग्रामपंचायतींसाठी नवीन कार्यालय इमारतींसाठी निधी द्यावा, तसेच तालुक्यातील विविध गावांच्या रस्त्यांच्या कामांसाठी देखील भरीव निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
अवैध गौणखनिज उपाशावर कारवाईची मागणी
रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने सांगोला व मंगळवेढा तालुक्यात गौणखनिजाचे अवैध उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत, त्या कंपनीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि अन्नसुरक्षा योजनेसाठी ईष्टांक वाढवण्याची मागणी
डाळिंब व द्राक्षबागांचे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत आले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी विनंती आमदार देशमुख यांनी केली. तसेच २०२५ च्या लोकसंख्येनुसार सांगोला तालुक्याचा ईष्टांक वाढवून शहरी भागासाठी ४७.५० टक्के आणि ग्रामीणसाठी ७६.४२ टक्के मंजूर करावा, जेणेकरून नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळू शकेल.
झोपडपट्ट्यांना संरक्षण व 'लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटी'ची मागणी
शहरातील इंदिरानगर आणि संजय नगरमधील झोपडपट्ट्यांना संरक्षित झोपडपट्ट्यांचा दर्जा देऊन त्यांना शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच बौद्ध समाजाची 'लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटी' स्थापनेसंदर्भातील दीर्घकालीन मागणीही पूर्ण करावी, अशी विनंती त्यांनी केली.
थकीत चारा छावणीची बिले ताबडतोब मिळावीत
ऐन दुष्काळात सुरू केलेल्या चारा छावण्यांची बिले अद्यापही न मिळाल्याने चारा छावणी चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या अगोदरही विधानपरिषद व विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला असला तरी अजूनही चारा छावणीची थकीत वेळे मिळाले नाहीत. सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील थकीत चारा छावणीची बिले ताबडतोब देण्यात यावीत अशी मागणी आमदार डॉ. देशमुख यांनी केली.
शासनाच्या दृष्टीने समस्या महत्त्वाच्या व्हाव्यात
या सर्व मागण्यांद्वारे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला मतदारसंघातील नागरी आणि ग्रामीण भागातील समस्या ठळकपणे मांडत सरकारचे लक्ष वेधले. "शासनाने केवळ आश्वासने न देता ठोस पावले उचलून ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावावे," अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात मांडली.
0 Comments