पंढरपूरमध्ये लाखोंच्या रांगेतही आमदार संतोष बांगर यांना २१ कार्यकर्त्यांसाठी हवं VIP दर्शन
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- एकीकडे आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी एक लाखांहून अधिक भाविक रांगेत उभे असताना, दुसरीकडे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे आदेश धुडकावून, सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या २१ कार्यकर्त्यांसाठी व्हीआयपी दर्शनाची सोय करण्याची मागणी करणारे पत्र मंदिर समितीला दिले आहे.
या प्रकारामुळे सामान्य वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले असले, तरी अनेकजण अजूनही व्हीआयपी दर्शनासाठी धडपड करताना दिसत आहेत. आमदार संतोष बांगर ( Santosh Bangar ) यांनी थेट पंढरपूर देवस्थान समितीला २१ जणांच्या नावाची यादी देत, त्यांच्या दर्शनाची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विक्रमी गर्दी झाली असताना, राजकीय नेत्यांचा आपल्या कार्यकर्त्यांसाठी व्हीआयपी दर्शनाचा आग्रह धक्कादायक ठरला आहे.
Santosh Bangar seeks VIP darshan for 21 workers
आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून निघालेले सात मानाचे पालखी सोहळे आणि इतर संतांच्या पालख्या पंढरपूरच्या जवळ पोहोचल्याने भाविकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. शुक्रवारी देवाचा पलंग निघाल्यानंतर २४ तास दर्शन सुरू झाले असून, दर्शन रांग थेट गोपाळपूरच्या बाराव्या पत्रा शेडच्या पुढे गेली आहे. सध्या एक लाखापेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.
आषाढी एकादशीसाठी शेगावमधून पंढरपूरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज पालखी दिंडीचे श्री क्षेत्र तुळजापूरमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मंदिर संस्थानने दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी एक वेळच्या जेवणाचा शिधा प्रदान केला. विठुनामाच्या गजराने आणि तुळजाभवानी देवीचा उद्घोष करत आलेल्या दिंडीमुळे संपूर्ण तुळजाभवानी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला होता.
दरम्यान, गहिनीनाथ गडावरुन निघालेल्या श्री संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रिंगण अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये पार पडले. निसर्गसौंदर्याच्या कुशीतून टाळ-मृदुंगाची साथ, श्रद्धा-समर्पण आणि भक्तिभावाने भारलेले हजारो वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले होते. श्री संत वामनभाऊ महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर संत असून, त्यांच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण सोहळा फक्त एकाच दिंडीचा असतो.
0 Comments