'प्रभाग रचना अंतिम करण्यास वाढीव कालावधी'; जिल्हा परिषद, पंचायत समितीचे वेळापत्रक जैसे थे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिका आणि जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वी प्रभाग रचनेसाठी १२ जून रोजी काढलेल्या आदेशात अंतिम प्रभागरचना प्रसिद्धीसाठी २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर अशी मुदत होती.
आता २३ जून रोजी काढलेल्या आदेशानुसार अंतिम प्रभाग रचनेसाठी २६ ते ३० सप्टेंबर अशी मुदत दिली आहे. महापालिका व नगरपरिषदेची प्रभागरचना अंतिम करण्यासाठी जवळपास एक महिन्यांचा वाढीव कालावधी मिळाला आहे.
पूर्वीच्या आदेशात प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी व दावे, हरकती स्वीकारण्यासाठी १५ ते २१ जुलै अशी मुदत महापालिका आयुक्त/नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आली होती. नव्या आदेशात ही मुदत १८ ते २१ ऑगस्ट अशी असणार आहे. जिल्हाधिकारी/जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी पूर्वी २२ ते ३१ जुलै अशी मुदत देण्यात आली होती. आता नव्या आदेशानुसार हरकती व सुनावणींसाठी २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर असा कालावधी असणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट-गण रचनेसाठी शासनाने पूर्वी जाहीर केलेले वेळापत्रक कायम आहे. जुन्या वेळापत्रकात काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे १४ जुलै रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर दावे, हरकती स्विकारून त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे.
त्यानंतर १८ ऑगस्टपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. महापालिका व नगरपरिषदेच्या आगोदर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रभाग रचना अंतिम केली जाणार असल्याने प्रत्यक्ष निवडणूकही जिल्हा परिषदेची आगोदर होईल, असा अंदाज बांधला जात आहे.
0 Comments