पालिका प्रशासनात खांदेपालट !
मुख्य लेखापाल, मुख्य लेखा परीक्षक
यांच्याकडे झोन नियंत्रणाची जबाबदारी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रशासनात खांदेपालट केली आहे. मुख्य लेखापाल तसेच मुख्य लेखा परीक्षक यांच्याकडे प्रथमच झोन नियंत्रण अधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून सार्वजनिक आरोग्य अभियंता तपन डंके यांच्याकडेही चार विभागांचे नियंत्रण अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे.आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी (मंगळवारी) सुधारित विभाग वाटपाचे आदेश काढले आहेत.या आदेशामुळे महापालिका प्रशासन व्यवस्थेलाच हादरा बसला आहे.यामध्ये मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी यांच्याकडे विभागीय कार्यालय क्रमांक पाच आणि मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांच्याकडे विभागीय कार्यालय क्रमांक दोनचे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे. महापालिकेचे आर्थिक आणि परीक्षणाचे काम पाहणान्या या दोन अधिकाऱ्यांकडे अशा पध्दतीने प्रथमच महापालिकेत नियंत्रण अधिकारीपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. यापूर्वी वित्तीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अशा पध्दतीने इतर विभागाची जबाबदारी सोपविली नव्हती. मुख्य लेखापाल यांच्याकडे वित्तीय विभागाची जबाबदारी असते. सर्व विभागावर त्यांचे नियंत्रण असते. नियंत्रण अधिकारी म्हणून एखाद्या झोन कार्यालयाची जबाबदारी दिल्यास कामाला मंजुरी देणे, त्यासाठी वित्तीय अभिप्राय मागणे मागितलेला कोणत्या निधी योग्य कामासाठी मागितला की नाही ते तपासणे त्यानंतर देवकांचा धनादेश देणे अशी जबाबदारी मुख्य लेखापाल आणि नियंत्रण अधिकारी म्हणून एकाच ठिकाणी एकवटणार आहे. यामुळे पारदर्शी कामकाजाला तडा जाण्याची शक्यता आहे. एकच व्यक्ती बिले बनविणार तपासणार आणि धनादेश देणार किंवा मंजुरी देणार हे कसे काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
चौकट
डंके बनले नियंत्रण अधिकारी !
उपअभियंता तपन डंके यांच्याकडे गेल्या महिन्यातच सार्वजनिक
आरोग्य अभियंतापदाची जबाबदारी सोपविली होती. अवघ्या
२१ दिवसानंतर डंके यांच्याकडे आता परिवहन, अतिक्रमण आणि
मंडई- कोंडवाडा व लायसन परवाना विभाग आणि पशुवैद्यकीय
विभाग महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय या चार विभागांचे नियंत्रण
अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. सार्वजनिक
आरोग्य अभियंतापद डंके यांच्याकडे राहणार की नाही याबाबत
अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही.
चौबे सार्वजनिक आरोग्य अभियंता ?
आयुक्तांनी २१ मे रोजी व्यंकटेश चौबे यांच्याकडे स्मार्ट सिटीचे
मुख्य तांत्रिक अधिकारीपदाचा पूर्णवेळ पदभार दिला होता. चौबे यांनी यापूर्वीच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज आयुक्तांकडे सादर केला आहे. त्याला आयुक्तांनी मान्यता दिली नसल्याचे समजते. यामुळे व्यंकटेश चौबे यांच्याकडे पुन्हा सार्वजनिक आरोग्य अभियंतापदाची जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
0 Comments