करमाळयाचे माजी आ. जयवंतराव जगताप शिवसेनेत यांचा प्रवेश
करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राजकीय धक्कातंत्र वापरत मुंबई येथील "मुक्तागिरी" निवासस्थानी उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख आणि शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे, शिवसेनेचे करमाळा - माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सांगलीचे विठ्ठल पाटील, सिंदखेडराजा जि.बुलढाण्याचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती . माजी आमदार जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्याचे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
जयवंतराव जगताप दोन वेळा करमाळ्याचे आमदार होते. 1990 साली अपक्ष तर 2004 साली शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती आमदार झाले होते.
2019 साली विधान सभेला संजयमामा शिंदे यांना विजयी करण्यात व 2024 साली नारायण पाटील यांना विजयी करण्यात जयवंतराव जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. माजी आमदार जगताप यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक देशभक्त स्व. नामदेवराव जगताप चार वेळा व चूलते स्व.अण्णासाहेब जगताप एक वेळेस आमदार होते. जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला फार मोठा लाभ होणार आहे. लवकरच करमाळा येथे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विकासाचा दृष्टिकोन असलेले नेतृत्व असून त्यांच्याच नेतृत्वाखाली धनुष्यबाण या चिन्हावर करमाळा नगरपालिकेवर, पंचायत समितीवर आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत भगवा फडकविणार असल्याचा निर्धार माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केला.
0 Comments